पेण (राजेश प्रधान) : पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारती मध्ये असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम वर 17 जानेवारी रोजी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी 56 लाख रुपये लंपास करून पोलिसांना आव्हान होते. या प्रकरणात तब्बल 11 महिन्यानंतर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी 2 आरोपींना गजाआड केले आहे. पोलिसांनी या 2 आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण शहरातील सनसिटी इमारतीमध्ये असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल 56 लाख 34 हजार 800 रूपये चोरून पलायन केले होते. दरोडेखोरांनी स्वतःबरोबर आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएम मध्येच टाकून पलायन केले होते. सदर तपासाकरिता फॉरेन्सिक पथकही पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी डॉग स्कॉड कुत्र्याची मदत घेण्यात आली होती.
तब्बल अकरा महिन्यानंतर पोलिसांना या दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवडल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी पेण येथील एटीएम फोडल्याची कबुली दिली. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी रायगड पोलिसांशकतो संपर्क साधला व दोन आरोपींना रायगड पोलिसांच्या स्वाधीन केले. इतर फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.