पोलादपूरच्या पावसाची यंदा सरासरी पर्जन्यमानाकडे झेप: 11 दिवसच शतकी नोंद-रानबाजिरे धरणही ओव्हरफ्लो

पोलादपूर (शैलेश पालकर) :  तालुक्यात पावसाने यंदा सरासरी पर्जन्यमानाकडे वाटचाल सुरू केली असून आगामी 24 तास संततधार अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे यंदा ही सरासरी पावसाची नोंद लवकर गाठण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, यंदा केवळ 11 दिवस शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद असल्याने यंदा सरासरी पर्जन्यमान ओलांडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तालुक्यातील रानबाजिरे येथील एकमेव यशस्वी धरण यंदा ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याचे मानले जात आहे.

पोलादपूर तालुक्यात दरवर्षी सरासरी 3680.57 मी.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. गेल्यावर्षी 21 ऑगस्टरोजी 4210 मी.मी. सरासरी पावसाची नोंद झाली होती. गुरूवारी पावसाची नोंद 3267 मि.मी. झाली असताना त्यामध्ये चोवीस तासांत 70 मीमी पावसाची नोंद वाढून 3337 मीमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सरासरी पावसाच्या 30.67 टक्के एवढी झाली आहे. अशातच, कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील सावित्री, घोडवनी, चोळई, कामथी आणि ढवळी या पाचही नद्या दुथडी भरून वाहात असताना पोलादपूर शहरानजिकचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाड एमआयडीसीला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेले एकमेव यशस्वी धरणही नेहमीपेक्षा आधीच 57.50मीटर्स ही पातळी भरून ओव्हरफ्लो झाले असून पाणीसाठा समाधानकारक झाल्याचा निर्वाळा देण्यात येत आहे. शुक्रवारी 55.90 मीटर्स एवढा पाणीसाठा या धरणामध्ये असल्याची नोंद प्राप्त झाली आहे.