पोलादपूर (शैलेश पालकर) : शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लोखंडी संरक्षक कठडयापासून काही अंतरावर दारू पिऊन झाल्यानंतर न जेवल्याने मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बुधवार दि.28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महेंद्र माळी या मार्बल दुकान व्यावसायिकाला पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लोखंडी संरक्षक कठडयापासून काही अंतरावर भूपेंद्र बियर शॉपी ते मनिष मार्बल या अंतर्गत रस्त्यावर अंदाजे 40 ते 45 वर्षे वयाच्या पुरूष जातीचे, डोक्यावरील केस वाढलेले व पांढरे झालेले तर दाडीमिशी पांढरी झालेली, हातावर अस्पष्ट गोंदलेले, काळया रंगाची नाडी असलेली हाफ बरमुडा पँट व बाजूने पिवळया रंगाची पट्टी तर निळया लाल रंगाची चौकडी लाईन असलेला टीशर्ट नेसलेले अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले.
प्राथमिक अंदाजानुसार ही व्यक्ती दारू पिऊन झाल्यानंतर न जेवल्याने भुकमरीने मयत झाली असावी, असे मत व्यक्त होत असून पोलादपूर पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 24-2022 नुसार नोंद केली आहे. या प्रेताला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. मात्र पोस्टमॉर्टेम करण्यात आले नसल्याची माहिती पोलादपूर पोलीसांनी दिली.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत नटे हे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असून पोलीसांनी दिलेल्या वर्णनानुसार कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.