पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यात आरोग्ययंत्रणेने सतर्क राहण्याच्या काळात अतिशय मृतवत अवस्था प्राप्त केल्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वपूर्ण आरोग्यसेवा देण्याची संधी असताना आरोग्य यंत्रणा आता पोलादपूर तालुक्यातील जनतेच्या जिविताशी खेळू लागली आहे. अशी परिस्थिती काळवली येथील शाळकरी मुलाच्या सर्पदंशाने मृत्यू होण्याने स्पष्ट दिसून आली आहे.
पोलादपूर तालुक्यात गेली काही वर्षे ग्रामीण रूग्णालय असून, अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. डॉक्टर अदृश्य असलेले देव आहेत आणि या रूग्णालयात जाणारे रूग्ण आणि त्याचे नातेवाईक महत्वाचा वेळ वाया घालवून रूग्णाला देवाघरी पोहोचविण्याचा मार्ग पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या मार्गे शोधत असल्याचे दिसून आले आहे.
बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काळवली येथील प्रतिक प्रमोद महाडिक हा 14 वर्षीय शाळकरी मुलगा घरामध्ये झोपला असता त्याला विषारी सर्पाने दंश केला. यानंतर तातडीने त्याच्या पालकांनी व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर येथे तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयामध्ये सव्वा एक वाजता उपचारासाठी आणले. मात्र, येथे डॉक्टर आणि योग्य उपचारसुविधा उपलब्ध नसल्याने प्रतिक याला महाड ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे त्याच्या उपचार सुरु असताना पहाटेच्या सुमारास प्रतिक याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
असाही विचित्र योगायोग
गुरूवारी दुपारी प्रतिक याच्या पार्थिवावर शवविच्छेदनानंतर शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, मध्यरात्रीनंतर पुन्हा प्रतिक याच्या घरी पुन्हा दुसरा विषारी साप आला आणि जागे असलेल्या प्रतिकच्या नातेवाईकांनी त्यास ठेचून मारले.
पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून कमालीची अनागोंदी सुरू असून याबाबत तक्रार करणाऱ्यांविरोधात बेताल आरोप करण्याची भूमिका जबाबदार वैद्यकीय अधिकारी घेत असल्याचे दिसून आल्याने समाजसेवी व्यक्ती आणि राजकीय व्यक्ती याठिकाणी जाण्यास धजावत नसल्याचे दिसून आले आहे. डेप्युटी डायरेक्टर डॉ.राठोड मॅडम आणि तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनीही या अवस्थेकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे.
महाड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ.भरत गोगावले यांनी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातील कोविड योध्द्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती पोलादपूर येथे आयोजित केला असता वैद्यकीय अधिक्षक पदाच्या अकार्यक्षतेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांच्या नावाने आलेल्या स्मृतीचिन्हावरील नांव स्वहस्ते खोडून रूग्णसेवा करणारे डॉ.राजेश शिंदे यांचा सत्कार केल्याचे दृश्य पंचायत समितीच्या बॅ.नाथ पै सभागृहामध्ये सर्व उपस्थितांनी बघितले आहे.
सध्या येथील मेडीकल ऑफिसर अन्यत्र बदली करून गेले असून केवळ आयुष सेवेतील डॉ.सलागरे आणि डॉ.राजेश शिंद हे दोन डॉक्टर सेवेत आहेत. यापैकी डॉ.राजेश शिंदे यांच्याकडे कोरोना संसर्गाचे नियोजन असून वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.भाग्यरेखा पाटील यांना महाड एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे.
परिणामी, तालुक्यातील रूग्णसेवेकडे सपशेल दूर्लक्ष होत असून ग्रामीण भागातील रूग्णजनतेचा जीव वाचविण्याचा बहुमूल्य वेळ पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात रूग्ण घेऊन आल्याने वाया जाऊन रूग्णाला जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या ग्रामीण रूग्णालयाला आरोग्य उपचारासाठी सुसज्ज करण्याची आवश्यकता असून राज्यसरकारने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.