पोलादपूर : किड व किटकांचा प्रादूर्भाव, कृषी अधिकार्‍यांनी केले ‘हे’ आवाहन

पोलादपूर (शैलेश पालकर) : पोलादपूर तालुक्यात उशीरा झालेल्या पावसामुळे लावणी सुद्धा उशिरा सुरू झाल्याने आता भातपिकांवर किड आणि किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे तालुक्यात किड व किटकांपासून रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरीराजा चिंतेत असून त्याचे वाढलेले काम हलके करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत विविध उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले आहे.

तालुक्यात भातपिकाचे प्रमाण सर्वाधिक असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिवसा विश्रांती घेत कडकडीत ऊन पडून शेतातील खाचरांमध्ये पाण्याच्या साठयावरील अंडयांपासून किडी आणि किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामध्ये निळे भुंगेरे आणि छोटे पतंग व फुलपाखरूसदृश्य किटकांचे प्रमाण अधिक आहे. तालुका कृषी अधिकारी  कैलास धुमाळ यांनी या किड व किटकांच्या नियंत्रणासाठी शेताच्या बांधावरील गवत कापून ते स्वच्छ ठेवावेत, शेताच्या खाचरातील जादा असलेले पाणी काढून टाकावे, क्विनॉलफॉस 25 इसी हे 40 मिली. किंवा ट्रायझोफॉस 40 इसी 13 मिली. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन 5 इसी 5 मिली. ही किटकनाशके प्रति 10 लिटर्स पाण्यातून फवारावी असे उपाय सुचवून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले आहे. शेतामध्ये उडणाऱ्या किटकांना वरच्यावर चोचीत पकडून फस्त करणारे पक्षी बसू शकतील, असे ढाक म्हणजेच पक्षीथांबे उभे करण्याचे यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून अनेकांनी उभारलेल्या पक्षीथांब्यावर बगळे व कावळे बसून किटक खाण्याचे काम करू लागले आहेत.

जिवाणूजन्य करपा व कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी भात खाचरात पाणी वाहते ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून युरिया खत जास्त प्रमाणात देऊ नये तसेच स्ट्रेप्टोमासीन सल्फेट 5 ग्रॅम आणि कॉपरऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करण्यास तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी सांगितले आहे. निळे भुंगेरे किडीच्या नियंत्रणाकरीता ाक्विंनॉलफॉस 20 टक्के 40 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 13 मि.ली. किंवा लॅमडासायहेलोथ्रिन 5 मि.ली. प्रति 10 लि. पाण्यामध्ये घेवून 10-12 दिवसाच्या अंतराने दोन फवारणी केल्यास या किडीचे पुर्णपणे नियंत्रण होईल. तसेच जिवाणू करपा व कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी भात खाचरात पाणी वाहते ठेवावे. स्ट्रटोमासीन सल्फेट 5 ग्रॅम आणि कॉपरऑक्सी क्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातुन फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कैलास धुमाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

तालुक्यातील शेतकरीराजा कोरोना लॉकडाऊन काळामध्ये घरातील चाकरमान्यांची संख्या वाढली आणि निसर्ग वादळाने पिडला असताना अचानक आलेल्या या किड व किटक रोगांमुळे त्रस्त झाला आहे.