पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालातील गोंधळ आता अधिकच वाढला असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिविल ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जोडपत्र 21 बदलला आणि नवीन सदस्यांची नांवे प्रसिध्द केल्याचे पत्र जारी केले आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अन्यायाची भावना निर्माण झालेल्या उमेदवारांकडून 12 जानेवारी 2023 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाच्या दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते तर क्रमांक 3च्या मनिषा निलेश शिंदे 146 आणि नोटा मते 02 अशी आकडेवारी दिसून येत आहे. याच प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे.
याच प्रभागातील क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 09 आणि क्रमांक 3चे उमेदवार सविता सदाशिव सोनावणे यांना 145 तसेच नोटा मते 01 अशी असल्याचे दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला आहे. या निकालाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करणारे पोलादपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी वसावे यांची स्वाक्षरी आहे.
जोडपत्र 21 नुसार जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पुढील प्रक्रियेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणूक निकाल जाहिर करण्याचे पत्र 16 बदलण्यात आले असून निवडून आलेलया उमेदवारांची माहिती उपोदघात क्रमांक 2 व 3 नुसार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. उपोदघात क्रमांक 4 नुसार ग्रामपंचायत निवडणूक निकाल प्रसिध्द करायचा असून सदरचा अधिकार जिल्हाधिकारी यांना उपोदघात क्रमांक 5 नुसार प्राप्त असल्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्या दि.23-12-2022 रोजीच्या पत्रामध्ये दिविल ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.
या पत्रानुसार, दिविल सरपंच सागर सखाराम देवे, सदस्य पदी प्रमोद चंद्रकांत मोरे, रंजना चंद्रकांत देवे, रूपाली तुषार पवार, विक्रम विष्णू भिलारे, सरिता राजेंद्र कदम, नयन विजय सुतार, अनिता नामदेव भिलारे यांची माहिती प्रभाग, आरक्षण आणि नावानिशी प्रसिध्द करण्याचा अधिकार रायगड जिल्हाधिकारी यांना उपोदघात क्रमांक 5 नुसार बजावला आहे. मात्र, दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार यातील विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांतील तफावत याबाबत प्रसिध्द करण्याच्या उपोदघात क्रमांक 4 व 5 नुसार स्पष्ट झालेली नाही.
पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर या निकालातील बदलामुळे अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून निवडणूक प्रतिनिधी विश्वास हरिश्चंद्र नलावडे यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर दि.12 जानेवारी 2023 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.