पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांपैकी दिविल ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये परस्पर बदल करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसह दि.20 डिसेंबर 2022 रोजीचे निकालपत्र कायम ठेवण्यासाठी विश्वास नलावडे या उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधीने गुरूवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी आमरण उपोषणास सुरूवात केली. यावेळी पोलादपूर तालुक्यातील असंख्य ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतमोजणी प्रक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी पार पडली. यावेळी दिवील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मतमोजणीदरम्यान निवडणूक निकालाच्या जोडपत्र 21 नुसार प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे. क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 09 मते मिळाल्याचे दिसून येत आहे. जोडपत्र 21 नुसार याच प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते पडल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तहसिलदार यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जे दोन उमेदवार निवडणूक निकाल जोडपत्र 21 नुसार पराभूत असल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकारी वसावे यांनी जोडपत्रातून मतमोजणीवेळी केली आहे, अशांनाच विजयी घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र 16 प्रमाणे माहिती बदलून पाठविल्याने जोडपत्र 21 नुसार निवडून आलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. याप्रकारची माहिती बदलून पाठविण्यासंदर्भात मोरे प्रमोद चंद्रकांत यांचा अथवा रूपाली तुषार पवार यांचा तसेच अन्य उमेदवार यांचा कोणताही आक्षेप नसताना अशाप्रकारे निकालात बदल करण्याचा अधिकार तहसिलदार पोलादपूर यांना तालुका दंडाधिकारी म्हणून प्राप्त आहे अथवा कसे याची स्पष्टता न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जोडपत्र 21 मध्ये विजयी घोषित केलेले भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याचे जाहीर न करताच अचानक पराभूत उमेदवारांना विजयी उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याचा प्रकार अन्याय्य झाला आहे.
कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे कारण पोलादपूर तहसिल कार्यालयाने पुढे करून आमरण उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे तर पोलादपूर पोलीस ठाण्याकडून जमावबंदी आदेशामुळे उपोषणास परवानगी नाकारून उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, नगरसेविका अंकिता निकम जांभळेकर, भाजपा महिला शहरसंघटक उज्ज्वला तथा माई शेठ, भाजपा गुजराती सेल उपाध्यक्षा प्रिती बुटाला, बेटी बचाओ अभियानाच्या कार्यकर्त्या सपना बुटाला व तनुजा भागवत, कलिका अधिकारी, शहरअध्यक्ष राजाभाऊ दिक्षित, राजन धुमाळ, चिकणे, संतोष कासार, महेश निकम, समाधान शेठ, श्रीकांत भिलारे, तुकाराम केसरकर, शेलार तसेच अन्य कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पोलादपूर तालुक्यात प्रथमच इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनच्या निकालानुसार जोडपत्र 21 मध्ये केलेली नोंद पत्र 16 नुसार बदलून जोडपत्र 21 नुसार निवडून आलेल्या उमेदवारांवर अन्याय करण्याचा प्रकार उघडकीस आला असून प्रशासनाने याप्रकरणी स्वत:चे दोष झाकून जोडपत्र 21 नुसार निवडून आलेल्या उमेदवारांवर अन्याय करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी रायगड आणि पोलादपूर पोलीस ठाणे यांच्यामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने याप्रकरणी आमरण उपोषणानंतर न्यायालयामध्येही दाद मागण्याच्या प्रयत्नामध्ये भाजपाचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे यावेळी जोडपत्र 21 नुसार निवडून आलेले उमेदवार मंगेश जंगम आणि सुवर्णा भिलारे यांनी सांगितले आहे.