पोलादपूर (शैलेश पालकर) : पोलादपूर तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भिती आता खरी ठरली असून गणेशविसर्जनानंतरच्या 48 तासांमध्ये तब्बल 32 पेशंट कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने आता ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या पन्नाशीपार जाऊन 51 झाली आहे. शुक्रवारी 22 तर शनिवारी एकूण 10 रूग्ण आढळल्याने ही कोरोनाची लाट दिसून आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील भैरवनाथनगर भागातील एकाच कुटूंबातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असलेल्या पतीचे निधन मुंबई येथे आणि कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण पत्नीचे निधन ठाणे येथे झाल्यानंतर या वृध्द पतीपत्नींच्या मृत्यूने शहरात अचानक कोरोनाची दहशत पुन्हा सुरू झाली. पुर्वीच्या 11 कोरोना मृतांच्या संख्येत या जोडप्यापैकी फक्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण पत्नीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पतीला मुंबईतील कोरोना मृत दाखविण्यात आले.
यानंतर कोरोना रूग्णसंख्या दोन दिवस वाढली नसताना गणेशविसर्जनानंतर शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये चक्क 22 रूग्णांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आली. यामध्ये 16 कापडे बुद्रुक, 3 पोलादपूर, 2 लोहारमाळ, 1 तुर्भे आणि शनिवारी 10रूग्णांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली असून यामध्ये पोलादपूर शहरतील प्रभातनगर 1, आनंदनगर 1 आणि सैनिक नगर येथील 2 अशा 4 रूग्णांसह कापडे व लोहारमाळ येथील 4 तसेच कापडे येथील 1, काळवली येथील 1 असे रूग्ण आहेत. आतापर्यंत 168 रूग्णांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली असून त्यापैकी 105 जणांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. अजून 51 रूग्ण रूग्णांची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने ते स्वतच्या घरी, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरसह अनेक ठिकाणी उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाबराव सोनवणे यांनी दिली.