पोलादपूर तालुक्यातील रस्ते आवश्यकते नुसार रूंद केल्यास राज्यसरकारकडे वर्ग करता येतील : पालकमंत्री अदिती तटकरे

palkar3

पोलादपूर (शैलेश पालकर) : रायगड जिल्ह्यातील दूर्गम डोंगराळ भागातील गावांकडे होणारी रस्ते वाहतूक अतिशय अरूंद रस्त्यावरून होत असून त्यांची लांबीदेखील मर्यादित असल्याने या रस्त्यांची कामे करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. हे रस्ते राज्यसरकारकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासोबतच रूंद करण्याची आवश्यकता आहे, यासाठी प्रशासकीय प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

पोलादपूर तालुक्यातील आड ते किनेश्वर, कापडे ते महाळुंगे रस्ता तसेच पळचिल ते सावरीची वाडी रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भुमिपूजन रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्याहस्ते शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे. महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले, राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी राजिप अध्यक्षा अपेक्षा कारेकर,राजिपचे स्थानिक सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पोलादपूर पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, ठिकठिकाणचे सरपंच आणि शिवसेनेचे महाड विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, शहरप्रमुख सुरेश पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सेवादल जिल्हा अध्यक्ष वाय.सी.जाधव, जिल्हा युवती अध्यक्षा प्रतिमा जाधव, तालुकाअध्यक्ष प्रतिभा पवार उपस्थित होते. यावेळी पोलादपूर तालुक्यातील आड ते किनेश्वर रस्त्याच्या भूमिपुजनावेळी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी मार्गदर्शन करताना हे मत व्यक्त केले.

पोलादपूर तालुक्यातील दूर्गमतेबाबत राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. कळंबे यांनी, किनेश्वर येथील रस्ता पेढावाडी तसेच प्रतापगडापर्यंत जाणारा असून महाळुंगेपर्यंतच्या रस्त्यावर कधी डांबरीकरण झाले तो ऐतिहासिक काळ ठरला आहे. पळचिल सावरीची वाडीपर्यंतचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ सुरू होत असून मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गापर्यंत जोडला गेला आहे, हे रस्ते आता नव्याने करण्याची गरज असून राज्यसरकारने त्यावर निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत मांडले.

यावेळी आ. भरत गोगावले यांनी, पोलादपूर तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी आपण माणगाव आणि महाडच्या तुलनेत दिला असून गेल्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निधी बंद होते पण आता सुरू झाल्यानंतरही पोलादपूर तालुक्याला आपण झुकते माप देत आहे, असे सांगून वेगवेगळया योजनांतून अन्य विकास कामेदेखील करायची असल्याने सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून आपण आणि महाआघाडी सरकारच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा नियोजन मंडळातून आपण आग्रही राहू, अशी ग्वाही दिली.