पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, कालवली, कापडे खुर्द या सहा ग्रामपंचायतींमध्ये तसेच सरपंच या एकमेव पदासाठी निवडणुकीला सामोरे जात असलेल्या लोहारे ग्रामपंचायतीच्या अशा एकूण सात ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया मोठया उत्साहामध्ये सुरू झाली.
पोलादपूर तालुक्यातील कालवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील सदस्यपदाचे उमेदवार आणि थेट सरपंचपदाचे तीनही प्रभागांतील मतदानाच्या प्रतिक्षेतील उमेदवार यांच्यासाठी सकाळपासून प्रचंड उत्साहात मतदान सुरू झाले. मतदार विशाल विलास महाडिक व दामिनी बाळकृष्ण रेणुसे यांचे कालवली मतदान केंद्रावर प्रथम मतदानाचा हक्क बजावताना स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कालवली येथे ज्येष्ठ नागरिक मतदार जनीबाई पिटू सकपाळ यांनी मतदानाचा हक्क बजावला असता त्यांचे स्वागत निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे सहाय्यक निवडणूक अधिकारी वंदना गिमेकर व कालवली ग्रामसेवक व्ही.बी.वानखेडे यांनी केले.
याचदरम्यान प्रभाग तीन येथील कालवली मोहल्ल्यामध्ये दोन सदस्यांची बिनविरोध निवड झाली असूनही तेथील मतदार मतदानासाठी रांग लावून असल्याचे दिसून आले. येथील मुनाफ अस्लम खलफे याची आज शादी असताना दुल्हेका सेहरा बांधलेल्या अवस्थेत त्याने लोकशाहीच्या कर्तव्य पालनासाठी मतदान केले. कालवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दुल्हेमियाँ मुनाफ याने मतदानाचा अधिकार बजावला. मतदान केंद्रांतील केंद्राध्यक्ष तसेच अन्य कर्मचारी यांनी दुल्हेमियाँ मुनाफ अस्लम खलफे यांचे स्वागत केले.
पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या आठ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली असताना उर्वरित सहा ग्रामपंचायतींच्या सदस्य तसेच सरपंच पदासाठी आणि लोहारे ग्रामपंचायतीच्या केवळ सरपंचपदासाठी मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरूवात झाली असता सर्वत्र उत्साह दिसून आला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष अशाप्रकारच्या राजकीय आघाडया व युत्या दिसून आल्याने पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बलाबल आणि मतदारांचा कौल हा पुढील पक्षचिन्हावरील निवडणुकांवेळीच स्पष्ट होणार असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.