पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला असून बुधवार, दि. 7 डिसेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्रांच्या माघारीनंतर कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध अन् कुठे होणार लढती, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली असून या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दि.2 डिसेंबर 2022 या अंतिम तारखेपर्यंत 16 सरपंच पदासाठी 35 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. तर 16 ग्रामपंचायतींच्या 116 सदस्य पदांसाठी 181 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी केवळ 1 नामनिर्देशनपत्र दि. 5 डिसेंबररोजी छाननी प्रक्रियेमध्ये अवैध ठरल्याने फारसा बदल घडून आलेला दिसून आला नाही.
बुधवार, दि. 7 डिसेंबर 2022 रोजी मागे घेण्याची मुदत संपुष्टात येत असून यावेळी बिनविरोध उमेदवारांची निवड समजून येणार आहे. यामुळे तालुक्यातील एकूण बिनविरोध ग्रामपंचायती तसेच एकूण बिनविरोध सरपंचांची आकडेवारी उपलब्ध होणार असल्याने प्रशासनावरील निवडणुकीचा ताण कमी होणार आहे.