पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यात तब्बल22 वर्षांनंतर पुन्हा एकदा शौचालय भ्रष्टाचार आडावळे खुर्द येथे उघडकीस आला असून यापूर्वी पोलादपूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीमध्ये असा प्रकार मोठया प्रमाणात उघडकीस येऊन महाराष्ट्रभर गाजला होता. तालुक्यातील आडावळे बुद्रुक ग्रामपंचायती अंतर्गत आडावळे खुर्द येथे’स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत 4 सीटचे शौचालय बांधकामाऐवजी केवळ 2 सीटचे शौचालय बांधून कामाच्या बिलापोटीची सर्व रक्कम दोष निवारण कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच काढण्यात यश आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असून पोलादपूर पंचायत समितीने याप्रकरणी गंभीर स्वरूपात दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारअर्जात करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यात राजकीय समीकरणांचा सामाजिक मेळ घालण्याच्या प्रयत्नात गावोगावी विविध शासकीय योजनांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार केला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत आलेल्यांच्या या गैरकारभाराविरूध्द स्थानिक ग्रामस्थ नेहमीच मूग गिळून गप्प बसत असल्याचे दिसून आले आहे. केंद्रसरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता देणाऱ्या पत्रामध्ये कामाच्या ठिकाणी 150 सेमी उंच आणि 90 सेमी रूंदीचा नामफलक कामाच्याठिकाणी लावून त्यावर योजनेचे नांव’स्वच्छ भारत मिशन’, कामाची अंदाजपत्रकीय किंमत 2 लाख रूपये, काम सुरू केल्याचा दिनांक व काम पूर्ण होण्याचा कालावधी, कंत्राटदाराचे नांव व ठिकाण नमूद करून गटविकास अधिकारी यांनी सदरची कामे पंचायत समिती स्तरावर पूर्ण करून घ्यायची असल्याचे प्रशासकीय मंजूरीच्या पत्रामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मात्र आडावळे बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत आडावळे खुर्द येथे ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत 4 सीटचे शौचालय बांधकामाऐवजी केवळ 2 सीटचे शौचालय बांधताना त्यावर 4 सीटचे शौचालय असल्याच्या उल्लेखासह सर्व मुद्दे लिहून बिलापोटी रक्कम काढण्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकारी यांचे दूर्लक्ष झाल्याची तक्रार विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारदार हेमंत युवराज भोईटे यांनी केली आहे.
आडावळे खुर्द येथील जय हनुमान सेवा मंडळासाठी हे 4 सीटचे शौचालयाचे बांधकाम मंजूर झाले असून ग्रामस्थ दरवर्षी हनुमानजयंतीचा उत्सव मोठया स्वरूपात आयोजित करीत असताना विविध शहरातून येणाऱ्या आबालवृध्द महिला-पुरूषांना या उत्सवावेळी शौचालयाअभावी उघडयावर प्रातर्विधी करावे लागत असल्याने या कामाचा पाठपुरावा करण्यात आला होता. या कामाची पूर्तता 10 जानेवारी 2020 रोजी झाल्यानंतर दोष निवारण कालावधी एक वर्षाचा असताना केवळ2 सीटचे शौचालय बांधल्याच्या वस्तुस्थितीकडे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष करीत’स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील भ्रष्टाचार घडविण्यासाठी संबंधित ठेकेदाराला बिलापोटी सर्व रक्कम अदा करूनच बदलीच्या ठिकाणी जाण्याची तत्परता दाखविली आहे.
परिणामी, तालुक्यातील विविध योजनांबाबत असाच अनागोंदी कारभार झाल्याची शक्यता वर्तविली जात असून पोलादपूर पंचायत समितीचे सदस्य सत्तेच्या सारीपाटात संगीत खुर्चीचा खेळ करीत असताना ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजकीय पाठिंब्याने झालेल्या भ्रष्टाचाराकडे सपशेल दूर्लक्ष झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थ याकडे गांभिर्याने पाहात नसले तरी अन्यगावी नोकरीव्यवसायानिमित्त राहणाऱ्या जागरूक नागरिकांनी आपआपल्या गावांतील मंजूर आणि पूर्ण योजनांचे सत्य आणि तथ्य समजून घेण्याचा आग्रह परगावी राहणाऱ्या जागरूक नागरिकांकडून होत आहे.