पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनद्वारे झालेल्या मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांची मते बदलली आणि दुसऱ्याच उमेदवारांना मते वाढवून विजयी घोषित केल्याने निवडणूक यंत्रणेकडून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. दिविल ग्रामपंचायतीमध्ये हा घोळ झाला असून गुप्तवार्ता पोलीस अहवालानुसार विजयी झाल्याच्या आनंदात मतमोजणी केंद्राबाहेर आलेल्या उमेदवारांना कमी मते मिळाली असून जे उमेदवार कोणासही तोंड न दाखविता परस्पर बाहेर निघून गेले त्यांना निवडणुक शाखेच्या कागदपत्रांनुसार विजयी घोषित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सध्या कागदोपत्री विजयी झालेले दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असल्याचे तालुक्यात सांगितले जात आहे. दरम्यान याप्रकरणी ‘कौन जिता? कौन हारा?’ याचा निकाल रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त होणार आहे.
मंगळवार, दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणीदरम्यान पोलादपूर तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल जाहिर करण्यात येऊन तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेकडून सर्व इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनद्वारे प्राप्त झालेल्या मतांच्या आकडेवारीचा उल्लेख संबंधित उमेदवारांच्या नावांसमोर करण्यात आला होता. यासंदर्भात महाराष्ट्र पोलीसच्या पोलादपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलादपूर तहसिल कार्यालयाने मतमोजणी केंद्रामध्ये स्थान न दिल्याने पोलादपूर पोलीसांनी बंदोबस्ताच्याठिकाणी बाहेर पडणाऱ्या विजयी उमेदवारांची नांवे जाणून घेत काही कालावधीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या नावासमोर मतांची आकडेवारी लिहून अहवाल तयार केला.
यावेळी लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि दिविल ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांची मतांची आकडेवारी जाहिर करण्यात विलंब झाला. दरम्यान, पोलादपूर पोलीसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही असल्याने त्यांनी मतदानाची आकडेवारी घेण्याचे अर्ध्यावर सोडून बोरघर ग्रामपंचायतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तिकडे प्रस्थान केले. परिणामी, पोलादपूर पोलीसांकडे दिविल ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवारांची मतांची आकडेवारी उपलब्ध नाही,अशी माहिती गुप्तवार्ता पोलीस इकबाल शेख यांनी दिली.
या दिविल ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील दोन उमेदवारांच्या विजयी घोषित करण्यासंदर्भात हा घोळ झाला असून पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या या घोळामुळे ‘कौन जिता? कौन हारा?’ हा विषय गंभीर चर्चेचा झाला आहे. पोलादपूर पोलीसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या अहवालानुसार दिविलचे विजयी उमेदवार आणि निवडणूक विभागाच्या कागदपत्रांनुसार विजयी उमेदवार यांच्यामधील तफावतीमुळे जिंकले कोण? हे फक्त निवडणूक विभागाच्या कागदपत्रांनुसार ठरणार आहे.
पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाच्या दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते तर क्रमांक 3च्या मनिषा निलेश शिंदे 146 आणि नोटा मते 02 अशी आकडेवारी दिसून येत आहे. याच प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे. याच प्रभागातील क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 09 आणि क्रमांक 3चे उमेदवार सविता सदाशिव सोनावणे यांना 145 तसेच नोटा मते 01 अशी असल्याचे दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधींनी वृत्तपत्रामध्ये सविस्तर अधिकृत निकाल प्रसिध्द केल्यानंतर दि. 21 डिसेंबररोजीच्या वृत्तपत्रामध्ये सदरची बातमी प्रसिध्द झाली. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधी पुराव्याखेरिज लिहित नसल्याचे माहिती असूनही अनेकांनी फोन करून माहितीचे स्त्रोत जाहिर करण्यास सांगितले. यावेळी अधिकृत कागदोपत्री पुरावे असल्याखेरिज अशी बातमी लिहिणे शक्य नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने सांगितल्यानंतर कागदोपत्री उल्लेखांचा मागोवा संबंधित उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांनी घेण्यास सुरूवात केली.
याचदरम्यान, दिविल ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील सर्वसाधारण स्त्री आणि अनुसुचित जाती या आरक्षणाच्या दोन नवनिर्वाचित सदस्यांपैकी खरे कोण असा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात निवडणूक शाखेने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्यांच्याकडून जोडपत्र क्रमांक 21 घेतल्यानंतर जोडपत्र क्रमांक 25 चा कागद पूर्णपणे कोरा असल्याचे संबंधित कागदपत्रांवरील माहिती घेतला प्रस्तुत प्रतिनिधीने पोलादपूर तहसिल कार्यालयातील महिला कारकूनच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी वसावे यांनी हे काम केले असून पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेने या निकालाकामी अक्षम्य दिरंगाई करीत कोण विजयी कोण पराभूत हे स्पष्ट होण्यास अडथळा निर्माण केला आहे.
मतमोजणी केंद्रातून आनंदात बाहेर आलेल्या उमेदवारांप्रमाणेच निवडणूक शाखेच्या कागदपत्रांनुसार विजयी झालेल्या उमेदवारांनीही आपली निवड अवैध ठरू नये, यासाठी पोलादपूर तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला असल्याने पोलादपूर तहसिल कार्यालयाने मतदान यंत्राच्या साह्याने केलेल्या घोळामुळे ‘कौन जिता? कौन हारा?’ याची चर्चा जोर धरत आहे.