पोलादपूर नगरपंचायतीची स्वच्छतेकडे दमदार वाटचाल : आ.गोगावले यांच्याहस्ते दोन घंटागाडयांचा शुभारंभ

पोलादपूर (शैलेश पालकर) :  नगरपंचायतीने गेल्या पाच वर्षांमध्ये पोलादपूरवासियांसाठी नियोजनबध्द विकासाचे प्रयत्न केले असून येत्या काही वर्षांमध्ये नगरपंचायतीच्या नियोजनाचे यश पाहण्यास मिळेल. नगरपंचायतीने केंद्रसरकारच्या निधीतून नगरविकास मंत्रालयामार्फत साडेबारा लाखांच्या दोन घंटागाडया लोकसंख्येच्या निकषावर मिळविल्या असून नगरपंचायतीची स्वच्छतेकडे दमदार वाटचाल सुरू असल्याचे मत आ.भरत गोगावले यांनी दोन घंटागाडयांचा शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष राजन पवार, उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, नगरसेवक नागेश पवार, नगरसेविका कल्पना सवादकर, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, मनोज प्रजापती तसेच मुख्याधिकारी विराज लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आ.गोगावले यांनी, राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यामुळे पोलादपूर नगरपंचायतीला तीन कोटींचा निधी प्राप्त होत असून याचे नियोजन पोलादपूरवासियांच्या सोयी-सुविधांसाठी करण्यासाठी आवाहन केले.

प्रस्तुत प्रतिनिधीने पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याकडे या घंटागाडी शुभारंभाविषयी माहिती मागितली असता, नगरपंचायतीचा हा यापुर्वीच्या शहरविकास आराखडयाचा भाग असून आधी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने काही तांत्रिक प्रश्न प्रलंबित राहिले होते. घनकचरा व्यवस्थापनासाठी जमिनीची उपलब्धता झाल्यानंतर या यंत्रसामुग्रीची उपयोगिता दिसून येणार आहे. सध्या सुरू असलेल्या कचरागाडीच्या कराराची मुदत कोरोना पार्श्वभूमीवर वाढवून दिल्याने सदरच्या ठेकेदारांच्या करारात नगरपंचायतीमार्फत घंटागाडी देण्याची मुद्दा नाही. त्यामुळे हा करार संपुष्टात आल्यानंतर नवीन निविदेमध्ये घंटागाडीच्या इंधन देखभाल खर्चाची जबाबदारी ठेकेदारावर सोपवून घंटागाडीचा वापर सुरू केला जाईल, अशी माहिती दिली. दरम्यान, पोलादपूर नगरपंचायतीसाठी एका फवारणीपंपाची खरेदी करण्यात आली असून हा पंप 50 मीटर्सपर्यंत पाण्याचा मारा करू शकत असल्यामुळे नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा नसल्याने आपदप्रसंगीही वापरता येणार आहे, अशी माहिती आवर्जून मुख्याधिकारी लबडे यांनी दिली.