पोलादपूर (शैलेश पालकर) : केंद्रसरकारने गेल्या दोन वर्षांचा खासदारांचा साडेबारा कोटींचा विकासनिधी गोठवला नसता तर पोलादपूर तालुक्यातील नायक मराठा समाजभवन एव्हाना मूर्त स्वरूपात दिसून आले असते. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये आ.गोगावलेंसोबत याकामी अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेत येत्या काही काळातच पोलादपूर नायक मराठा समाजभवनाची उभारणी अखंडीतपणे व्हावी. यासाठी प्रयत्न राहतील, अशी ग्वाही रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
चोळई येथील पोलादपूर नायक मराठा समाजभवनाच्या कार्यालयाचे उदघाटन खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते फित कापून तर आ.भरत गोगावले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह समाजभवनाच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे, समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे, कार्याध्यक्ष मोहन शिंदे, किशोर जाधव, मुंबई विभाग कार्याध्यक्ष सुभाष पवार, वाय.सी.जाधव, संतोष मेढेकर, अनंत पार्टे तसेच अन्य पदाधिकारी व निमंत्रक होते.
यावेळी उदघाटनपर भाषणात खा.तटकरे यांनी पुढे फक्त महाडमध्येच सगळं न्यायचं, रोह्यामध्ये न्यायचं असं चालायचं नाही तर नजिकच्या काळामध्ये पोलादपूर तालुक्यातदेखील एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्याला ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी चांगली आहे. नायक मराठा सेवा संघाच्या मराठा भवन इमारतीसह येथील शहीद जवानाचे होणारे स्मारक हेदेखील येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले. सुत्रसंचालकांनी आमदारांचा उल्लेख गोरगरिबांच्या कैवारी असा केला आणि आपला उल्लेख खासदार असा केला, असे सांगून का तटकरे यांनी, एकटेच गोरगरिबांचे कैवारी आहेत? असा सवाल करीत गेली चाळीस वर्षे आपण पाचवेळा आमदारकी केली, आता खासदारकी करतोय. ते गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय शक्य झाले का? यात गंमतीचा भाग सोडला तर आ. भरतशेठ असो वा आपण सातत्याने गोरगरिबांसाठी काम करीत आहोत, म्हणूनच जनता वारंवार निवडून देत आहे, असा ‘कहींपे तीर, कहीपे निशाना’ खा.तटकरे यांनी साधला. येत्या 6 फेब्रुवारीला जिल्हा विकास व नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समोर या मराठा समाजभवनाच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करून लवकरच हे काम न थांबता पुर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही खा. तटकरे यांनी दिली.
याप्रसंगी आ.गोगावले यांनी, पोलादपूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी विकासाचे झुकते माप देऊ केले असताना खा. तटकरे यांच्या माध्यमातून मराठाभवन ही नायक मराठा समाजाची दिमाखदार वास्तू उभी राहात आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपणहून सहकार्य करावे. खासदारांकडे तालुके खुप आहेत ते तेवढी मदत देतील आपण आमदार आहोत आपल्यापरीने हातभार लावू तशाचप्रकारे इतरांनीही यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन यावेळी केले.
प्रारंभी बांधकाम समितीचे अध्यक्ष व राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, पोलादपूर तालुक्याला नरवीरांपासून शहिदांची परंपरा असून अलिकडच्या काळातही अनेक शहिद जवान झाले आहेत. त्यांचे स्मरण करण्यासाठी या नायक मराठाभवनासोबत शहिदांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. कोणाला वाटत असेल की या कामानिमित्त आम्ही समाजामध्ये भांडणं लावत आहोत तर ते चुकीचे आहे. समाजाची वास्तू उभी राहणे महत्वाचे आहे यासाठी सर्वपक्षिय समाजबांधवांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी मुंबई विभाग कार्याध्यक्ष सुभाष पवार यांनीही त्यांचे विचार मांडले.
यावेळी पोलादपूर तालुक्यातील विविध मान्यवरांचे तसेच व्यासपिठावरील मान्यवरांचे पोलादपूर तालुका नायक मराठा सेवा समाज संघातर्फे स्वागत करण्यात आले. खा. सुनील तटकरे आणि आ.भरत गोगावले यांचा यावेळी समाजातर्फे जाहिर सत्कार करण्यात आला. निमंत्रण पत्रिकेतील अनेक मान्यवरांची अनुपस्थिती यावेळी जाणवत असली त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे सभामंडपामध्ये उपस्थित होते.