पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर पार पडलेल्या मतमोजणीनंतरही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वर्चस्व दिसून येत आहे. ग्रामविकास आघाडी आणि महाविकास आघाडीकडे तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी 2-2 ग्रामपंचायतीं गेल्याने मतदारांचा कौल स्पष्ट दिसून येत नसल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीसह शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा सरपंच पदाद्वारे फडकला आहे. 16 पैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व असल्याचा दावा सोशल मिडीयावरून करण्यात आला असताना पैठण ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणेच मतदारही आपला कौल स्पष्ट करीत नसल्याचे उघड झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील दूर्गम आणि दरडग्रस्त ग्रामपंचायत बोरघरमध्ये यावेळी आदिवासी खेडेगांव होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या महादेवाचा मुरा गावातील शेकापक्षातर्फे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर बंडू विठू पारधी अनुसूचित जमातीचे आरक्षण असलेल्या सरपंच पदाचे उमेदवार 497 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच पदासाठी दावेदार सुनील गायकवाड यांचा पराभव केला. प्रभाग 1 मध्ये मनिषा पारधी (123) आणि नामदेव पार्टे (127) हे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग 2 मध्ये गीता गोगावले (253)आणि निवृत्ती कदम (260)हे विजयी झाले. प्रभाग 3 मध्ये सुनंदा आंबले (248), इंदूबाई उलालकर, चंद्राबाई उलालकर(120) आणि नारायण उतेकर (124) हे विजयी झाले.
लोहारे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी दीपक, पवार विजयी; ग्रामविकास आघाडीचे यश
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वात आधी हालचाली सुरू होऊन थेट सरपंच पदाचे उमेदवार दीपक पवार (739 मते) मिळवून विजयी झाले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सरपंच पदाचे उमेदवार समीर साळुंखे यांना (291 मते) पराभव पत्करावा लागला.
लोहारे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये प्रतिभा सुर्वे, परशूराम नरे, श्रीकांत निकम, प्रभाग 2 मध्ये हरिश्चंद्र मांढरे, मनिषा साळवे, नारायण शेडगे,प्रभाग 3मध्ये चंदा पवार, सुषमा पवार संदेश नरे आदी नऊ सदस्यपदाचे उमेदवार बिनविरोध जाहिर करण्यात आले.
धामणदिवी येथे सरपंचपदी क्षमता बांद्रे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरडीचा धोका असलेल्या धामणदिवी गावामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी क्षमता बांद्रे (171 मते विजयी) विरूध्द अनिकेत वाडकर (45 मते) अशी थेट लढत महाविकास आघाडीची सरशी झाली. प्रभाग 1 मध्ये वर्षा जाधव (30मते विजयी), रंजना चव्हाण (30 मते विजयी), नथूराम जाधव (34 मते विजयी), प्रभाग 2 मध्ये करूणा बांद्रे (40मते विजयी)हे विजयी झाले असून रामदास कदम यांची दुसऱ्या जागेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 3 मधील रामभाऊ रांगडे आणि प्रिया भावे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
चांभारगणी बुद्रुकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील या चांभारगणी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तानाजी पवार (644 मते विजयी) यांनी सतीश गोळे (525 मते) यांचा पराभव केला. प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी पुष्पा सोंडकर (276 मते विजयी), सहदेव येरापले (262 मते विजयी), राजेश कोंद्रे (244 मते विजयी) यांनी मतांच्या आघाडीसह सरपंचपदाच्या उमेदवारास चांगलेच सहकार्य केले. प्रभाग 2 मध्ये 3 जागांसाठी मंदा बर्गे (215 मते विजयी), द्रौपदी घोलप (193 मते विजयी), गणेश तळेकर (217 मते विजयी) हे विजयी झाले तर प्रभाग 3 मध्ये 3 जागांवर वैशाली पवार, सारिका जाधव आणि पांडूरंग दळवी हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कालवली सरपंच पदी नवलाई आघाडीचे किरण पवार
पोलादपूर तालुक्यातील कालवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाचे योगेश महाडीक (232 मते) हे सरपंचपदासाठी सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करीत असताना त्यांचा नवलाई आघाडीचे किरण पवार (285 मते विजयी) यावेळी पराभव केला.
या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 चे प्रियंका पार्टे, सविता भोसले आणि गणपत शिंदे हे बिनविरोध निवडून आले असून प्रभाग 2 मध्ये बाळाराम महाडीक (77 मते विजयी) आणि समिक्षा सकपाळ (77 मते विजयी)हे दोन सदस्य निवडून आले आहेत. प्रभाग 3 मध्ये महामूद तिवडेकर आणि बेगम वलीले हे शेकापक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध जाहिर झाले आहे.
दिविल महाविकास आघाडीकडे सत्ता
दिविल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सागर देवे (390 मते विजयी) यांनी थेट लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवार गोपाळ चांढविकर (352 मते) यांचा पराभव केला. प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी मंगेश जंगम (189 मते विजयी), रंजना देवे (211 मते विजयी), सुवर्णा भिलारे (171 मते विजयी) हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 2 मध्ये विक्रम भिलारे (88 मते विजयी), सविता कदम (103 मते विजयी) हे विजयी झाले. प्रभाग 3 मध्ये अनिता भिलारे(102 मते विजयी)अािण नयन सुतार (115 मते विजयी)हे विजयी झाले आहेत. दिविलमध्ये काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भाजप अशी महाविकास आघाडी विजयी झाली. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला याठिकाणी अपेक्षित यश मिळू शकले नाही.
भोगाव खुर्दमध्ये सरपंचपदी बाळासाहेबांची शिवसेना
भोगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आरक्षणासाठी प्रियंका कदम (310 मते विजयी) चौरंगी लढतीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. प्रभाग 1 मध्ये दोन जागांसाठी सुजाता कदम (142 मते विजयी), निता निकम (131 मते विजयी) या निवडून आल्या असून तिसऱ्या सदस्यपदासाठी सूर्यकांत कदम बिनविरोध निवडून आले. प्रभाग 2 मध्ये कुंदा चिकणे (100 मते विजयी)झाल्या असून विष्णू काळप हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग 3मध्ये कविता नलावडे (142 मते विजयी) या निवडून आल्या असून लहू पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.