पोलादपूर (शैलेश पालकर) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर ते महाडदरम्यानचा ब्रिटीशकालीन पुल कोसळून अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाल्यानंतर अल्पावधीतच बांधून स्ट्रक्चरल ऑडीटशिवाय लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन सावित्री पुलावरील लोखंडी चॅनेल तुटल्याने या पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील अभियंत्यांना याबाबत कोणतेही गांभिर्य वाटत नसले तरी अचानक कोणत्याही प्रकारे या पुलाला हानी पोहोचल्यास पुलावरील किती वाहनांना हानी पोहोचेल, अशी धास्ती प्रवासी व वाहतूक करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मंगळवार, दि. 2 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्री मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याच्या झालेल्या दूर्घटनेनंतर शोधकार्यात 2 एस.टी.गाडया आणि 1 तवेरा गाडीसह 29 मृतदेह शोधण्यात यश आल्यानंतर उर्वरित बेपत्तांना मृत घोषित करून सरकारी आर्थिक मदत देण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन (पीडब्ल्यूडी)मुख्य अभियंता व्ही.एस.देशपांडे यांनी, सावित्री पुलाच्या दूर्घटनास्थळापासून काही अंतरावर दोनशे मीटर्स लांबीचे आणि तीनपदरी वाहतुकीसाठी असे दोन पुल बांधण्याचे प्रस्ताव खर्चाचा अंदाज आणि संकल्पनाचित्रासह तयार करण्यात आला असून सन 2000 साली बांधण्यात आलेल्या पुलापेक्षा हे दोन्ही पुल उंच असतील. मात्र, सावित्रीच्या पात्राचा पुराच्या पाण्याचा प्रवाह पाहता यापैकी एक पुल सन 2000 साली बांधण्यात आलेल्या पुलाच्या उजव्या तर दुसरा पुल कोसळलेल्या ब्रिटीशकालीन पुलाच्या डाव्या बाजूला बांधण्यात येईल, अशी संकल्पना असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या राजेवाडी ते नांगलवाडी गावांमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याच्या घटनेला केवळ 10 महिने झाले असताना याठिकाणी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम पुर्णत्वास गेलेले दिसू लागले आणि या कामाच्या लोकार्पणाची लगबग सुरू झाली होती. यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडीट न करताच नवीन पुलाचे लोकार्पण होणार असल्याच्या बातम्यांवर नवीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करायचे नसते, अशा वल्गना महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काही राजकीय व्यक्तींमार्फत पत्रकारांपर्यंत पोहोचविल्या होत्या. त्यामुळे केवळ 165 दिवसांमध्ये सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळलेल्या ठिकाणी हा नवीन पुल उभारून त्याचे लोकार्पण 5 जून 2017 रोजी करण्यात आले होते.
याच नदीपात्रावरील दुसरा नवीन पुल गेल्यावर्षी 17 मार्च 2022 रोजी कोणताही गाजावाजा न करता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
मात्र, आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या राजेवाडी ते नांगलवाडी गावांमधील सावित्री नदीवर दोन नवीन पुल उभारल्यानंतर आधीचा ब्रिटीश कालीन पुल आणि त्यानंतर 2000साली बांधलेला कमी उंचीचा पुल हे दोन्ही गेल्या चार वर्षांत तोडण्यात आले आहेत.
लोकार्पणानंतर केवळ पाचच वर्षांत मंगळवारी सकाळी पहिल्या नवीन सावित्री पुलावरील लोखंडी चॅनल तुटल्याने संपूर्ण पुलाला हादरे आणि तीव्र स्वरूपाची कंपनं जाणवू लागल्याने पुलावरून महाडकडे जाणाऱ्या वाहनांसह वाहनचालकांना या पुलाचा धोका वाटू लागला आहे. यासंदर्भात ते केवळ लोखंडी चॅनेल असून चॅनेल तुटल्याने पुल कोसळणार नसल्याचे अभियंत्यांकडून बोलले जात असून या मजबूत पुलाला प्रत्येक गिर्डलवर लोखंडी चॅनेल बसविण्यामागे पुलाचे बांधकाम शोभिवंत करण्याचा हेतू होता काय, असा सवाल उपस्थित होत आहे. महाड येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंता मेश्राम आणि म्हाडकर यांनी यासंदर्भात पत्रकारांच्या कोणत्याही संपर्काला दाद न देण्याचे धोरण स्विकारले असून त्यांचे मौन हे ‘मौनम् सर्वार्थ साधनम्।’ पध्दतीचे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.