पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील माटवण या महसुली गावात रविवार, दि.31 मे 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ शिवसैनिक गणपत विश्राम मांढरे यांची निर्घृण हत्या झाली. शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षामधील राजकीय वादाची परिणिती जीवघेण्या हल्ल्यात होऊन पोलादपूर पोलीसांनी एफआयआरमध्ये या खुनप्रकरणी तब्बल 42 आरोपींचा समावेश करून तपासादरम्यान आरोपींची संख्या कमी करीत शेवटी केवळ 9 आरोपींचा समावेश या गुन्ह्यात निश्चित केला. मंगळवार, दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश टी. एम. जहागिरदार यांनी सर्व 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 50 हजार रूपये दंड ठोठावला आहे.
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टरमध्ये यातील मयत गणपत विश्राम मांढरे (55) व फिर्यादी अतुल गणपत मांढरे यांचे आरोपींसोबत वाद असून सर्व आरोपी एकाच गाव परिसरातील असल्याचे तसेच शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन राजकीय पक्षांच्या वर्चस्वावरून हा वाद सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वादावरून वैमनस्य झाल्यावरून आरोपींनी रविवार, दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याच्या मंडळींची गर्दी जमवून कट रचून गणपत विश्वास मांढरे हे त्यांच्या हिरोहोण्डा स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच36 बीबी 5344)वरून विलास पांडुरंग गोगावले यांच्या गुरांच्या वाडयाजवळून माटवण येथून कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना रस्त्यात अडवून लाकडी दांडक्यांनी व बांबूंच्या काठयांनी डोक्यावर व कपाळावर मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना घडली होती. याचवेळी मा. जिल्हादंडाधिकारी यांचा कोरोना विषाणू संसर्ग अन्वये काढण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने तब्बल 42 जणांना आरोपी करण्यात आले.
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये मृत गणपत विश्राम मांढरे यांचा सख्खा भाऊ सखाराम विश्राम मांढरे (वय50) याच्यासह विठ्ठल कृष्णा म्हस्के (वय 55) हे दोघे आत्मसमर्पणासाठी हजर झाले तर अधिक तपासादरम्यान पोलादपूर पोलीसांनी विकास विठ्ठल म्हस्के (वय 24), संकेत नारायण म्हस्के (वय 29), विलास पांडुरंग गोगावले (वय 40), नाना नथू मांढरे (वय 50) आणि नाना धोंडू म्हस्के (वय 55), यांना अटक करण्यात आली. रविवार, दि.31 मे 2020 रोजी रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या तपासी अंमलाखाली 28-2020 नुसार भा.दं.वि. 302, 341, 143, 147, 148, 149, 120(ब), 188, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 37(1)(3), 135 आदी कलमान्वये गुन्हा 42 आरोपींविरूध्द दाखल करण्यात आला.
यात आधीच्या 7 आरोपींसोबत स्वप्नील सखाराम मांढरे, शंकर गजानन सागवेकर, गणेश नाना म्हस्के, शैलेश शंकर सागवेकर, विजय अशोक नगरकर, राजेंद्र अशोक नगरकर, महेश नथू मांढरे, कमलाकर गजानन सागवेकर, कृष्णा धोंडू म्हस्के, रोशन कृष्णा म्हस्के, काशिनाथ शांताराम म्हस्के, देऊ धोंडू शिंदे, समीर नारायण म्हस्के, दत्ताराम भाऊ पवार, सुशांत दत्ताराम पवार, प्रशांत दत्ताराम पवार, संतोष लक्ष्मण डिगे, संतोष पवार, तुळशीराम धोंडू म्हस्के, गणपत सुंदर मांढरे, चंद्रकांत बावळेकर, गणेश गोगावले, शिवाजी शंकर गोगावले, कैलास धोंडू नवगणे, प्रमोद परशुराम करंजे, सिताराम म्हस्के, नारायण म्हस्के, राम गायकवाड, विश्वास बाटे, निलेश बाटे, एकनाथ अर्जून मांढरे, रवींद्र नथू मांढरे, राजू श्रीपत कालगुडे आणि दत्तात्रेय उतेकर आदी 34 आरोपींचाही समावेश तपासाअंती करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी केल्यानंतर या 34 पैकी राजू श्रीपत कालगुडे आणि कैलास धोंडू नवगणे या दोन आरोपींचा आधीच्या सखाराम विश्राम मांढरे, विठ्ठल कृष्णा म्हस्के, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू मांढरे आणि नाना धोंडू म्हस्के या सात आरोपीसोबत समावेश करून एकूण 9 आरोपी निश्चित करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय माणगांव येथे झाली असता या खटल्याप्रकरणी सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले 19 न्यायनिर्णय दाखल केले. यावेळी फिर्यादी यांना मदतनीस म्हणून ऍड.मोहिनी शेठ यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी यु.एल.धुमास्कर, पोलीस हवालदार शशिकांत कासार, महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, पोहलीस हवालदार शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले.
गुन्ह्याच्या शाबितीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधिश टी. एम. जहागिरदार यांनी सर्व 9 आरोपींना भा.दं.वि.कलम 302 सह 149 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 50 हजार रूपये दंड ठोठावला तर दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजूरी आहे. भा.दं.वि.कलम 341 सह 149 प्रमाणे 1 महिना साधी कैद, भा.दं.वि. कलम 143 सह 149 प्रमाणे 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा, भा.दं.वि. कलम 147 सह 149 प्रमाणे 2 वर्ष सक्तमजूरी आणि भा.दं.वि.कलम 148 सह 149 प्रमाणे 3 वर्षे सक्तमजूरी तसेच भा.दं.वि. कलम120-ब अन्वये 2 वर्षे सक्तमजुरी सर्व 9 आरोपींना सुनावली.
पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांमधील या वादाचे पर्यवसान गणपत विश्राम मांढरे यांच्या निर्घृण हत्येमध्ये झाल्यानंतर त्यांच्या भारतीय सैन्यातील मुलानेही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोपीविरूध्द कारवाईसाठी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला तर काही राजकीय प्रवेशाही या पार्श्वभूमीवर झाले होते.