पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील नदीपात्रामधील गोडया पाण्यातील मासेमारी करण्यासाठी विषारी गोळयांची विक्री करण्याकरिता स्वत:च्या राहत्या घरामध्ये बाळगून स्वत:च्या आणि फिर्यादीच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलादपूर तालुक्यात मासेमारीच्या गोळया निष्काळजीपणे हाताळल्याप्रकरणी अनेकांना जिवानिशी मुकावे लागले आहे. यामुळे या गोळयांच्या विक्रीवर कायद्याने बंदी असताना अनेकजण बेकायदेशीररित्या स्वत:च्या फायद्याकरीता या गोळयांची विक्री करीत असल्याची तक्रार बेबी आप्पा सुतार या 75 वर्षीय महिलेने केल्यावरून पोलादपूर पोलीसांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गाडीतळ पोलादपूर येथील फिर्यादीच्या घरातून आकाश बाबू सुतार (वय 22 वर्षे ) आणि राजेश रवींद्र जांभळेकर (वय 40 वर्षे) यांच्याकडून 250 ग्रॅम वजनाच्या अंदाजे 200 रूपये किंमतीच्या सफेद रंगाच्या मासे मारण्याच्या विषारी गोळया हस्तगत केल्या आणि दोन्ही आरोपींविरूध्द दखलपात्र गुन्हा र.नं.126-2022 भा.दं.वि.सं.284 कलमान्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिरगांवकर हे अधिक तपास करीत आहेत.