पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील बहुचर्चित मोरगिरी येथील अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान करणाऱ्या नराधमांचे कृष्णकृत्य उघडकीस आल्यानंतर आता कापडे बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयामधील नवतरूणीवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादल्याच्या घटनेने तालुक्यातील नवतरूणी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
याप्रकरणी मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधील पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात येऊन पोलादपूर पोलीस ठाण्यात शून्य नंबरने तपासाला आल्याची माहिती प्राप्त झाली. याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी एका आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला असून अद्याप अटक नसल्याचे सांगण्यात आले आहे.
एप्रिल 2007 मध्ये जन्मलेली षोडशवर्षीय नवतरूणी पोलादपूर तालुक्यातील किनेश्वरवाडी येथील कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिकत असून ऑगस्ट 2022 मध्ये माध्यमिक विद्यालयासमोरील राधाकृष्ण हॉटेलच्या मागील झाडीझुडपामध्ये भवानवाडी कापडे बुद्रुक येथील आरोपी अर्जून सकपाळ (पूर्ण नांव माहिती नाही) याने सदर पिडीता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यासोबत मैत्री करून तिच्या ओळखीचा फायदा घेऊन तिच्यासोबत वेगवेगळया ठिकाणी तिच्या इच्छेविरूध्द शारिरीक संबंध ठेऊन तिला पाच महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा र.नं.1232022 नुसार भा.दं.वि.376(2)(एन)सह पोक्सोप्रमाणे 4,6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणी अल्पवयीन नवतरूणीचा गर्भपात करण्यासाठी मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी थेट तेथील पोलीस ठाण्यामध्ये तिच्या अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल केला आणि सदरचे प्रकरण रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडील आर.बी. 406-गुन्हा वर्ग-2022-5193 या जावक क्रमांकाच्या पत्रान्वये पोलादपूर पोलीसांना आदेश प्राप्त होताच दि. 4 डिसेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजून 52 मिनीटांच्या सुमारास पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत असून याप्रकरणी मोरगिरी पोक्सोप्रकरणाची पुनरावृत्ती झाली असल्यास एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.