पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येऊन 50 टक्के महिलांना आरक्षण देण्यात आल्याने 21 ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रवर्गातील महिला सरपंच विराजमान होणार आहेत. यामध्ये 12 सर्वसाधारण, 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग,2 अनुसुचित जमाती आणि 2 अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांना सरपंच पदाची संधी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मिळणार आहे. 2020 ते 2025 यादरम्यानच्या निवडणूकांनंतर सरपंचपदासाठी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी महाडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनी शहरातील स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन केले होते.
पोलादपूर तालुक्यातील आडावळे बुद्रुक आणि कापडे बुद्रुक येथे अनुसुचित जाती महिला तर धारवली येथे अनुसुचित जाती खुला असे आरक्षण काढण्यात आले आहे. बोरज आणि माटवण येथे अनुसुचित जमाती महिला आणि बोरघर येथे अनुसुचित जमाती खुला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पार्ले, उमरठ, देवळे, कोंढवी, मोरगिरी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण असून वाकण, दिवील, पांगळोली, मोरसडे, चरई, कापडे खुर्द येथे नामाप्र खुला आरक्षण एकूण आरक्षणाच्या 27 टक्के प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा, महालगूर, पैठण, गोवेले, भोगाव खुर्द, सवाद, कोतवाल बुद्रुक, ओंबळी, बोरावळे, सडवली आणि पळचिल येथे निश्चित करण्यात आले असून देवपूर, धामणदिवी, परसुले, कुडपण बुद्रुक, लोहारे, चांभारगणी बुद्रूक, गोळेगणी, तुर्भे खुर्द, महाळुंगे, वझरवाडी, कोतवाल खुर्द, कालवली, काटेतळी सर्वसाधारण खुला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आल्याने तालुक्यातील उर्वरित 42 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण यावेळी काढण्यात आले आहे.