पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

अलिबाग :  कर्तव्य बजावणा-या पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीना सश्रम कारावास व दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधिश जयदीप मोहीते यांनी सुनावली. आरोपी जयश्री सुरेश गव्हाणकर आणि मयुर सुरेश गव्हाणकर, रा. बदलापुर ता, कल्याण, जि. ठाणे अशी या आरोपींची नावे आहेत.

गुन्हयाची थोडक्यात हकिगत अशी की, दि. ०५.८.२०१८ रोजी पेण नंदीमाळ नाका विश्वेश्वर मंदीराचे रोडलगत एका टपरीत आरोपी कविता दिलीप पाटील अवैध दारू विक्रीबाबत छापा मारून त्या गुन्हयामधील आरोपी कविता दिलीप पाटील यांचेविरुध्द कारवाई फिर्यादी पोलिस उप-निरिक्षक नरेंद्र पाटील पोलिस स्टेशन हे कारवाई करीत असताना कविता दिलीप पाटील यांची नातेवाईक असलेली आरोपी नं. १ जयश्री सुरेश गव्हाणकर व आरोपी नं. २ मयुर सुरेश गव्हाणकर यांनी पंचास शिवीगाळ केली तसेच आरोपी नं. १ हि अंगावर मारणेस धाऊन येऊन ती बाई असल्याने तुला खोटया केसमध्ये अडकवुन नोकरी घालण्याची धमकी दिली तर आरोपी नं. २ यांनी फिर्यादीची कॉलर पकडुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी साक्षीदार पो, कॉ. वाघ यांनी सोडावण्याचा प्रयत्न केला असता त्यांस आरोपी नं. २ यांनी देखील धक्काबुक्की केली व साक्षीदार गजानन वेरवी यांचे कानफटात मारली. घटनेबाबत फिर्म्यादी नरेंद्र पाटील, पोलिस उप-निरिक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीचे आधारे पेण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास सहा, पोलिस निरिक्षक डी. बी. वेडे यांनी केला व आरोपीचे विरूद्ध दोषारोपत्र दाखल केले.

याकामी सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अमित म. देशमुख यांनी कामकाज पाहीले. न्यायालयात आलेला सबळ साक्षीपुरावा व सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून अतिरिक्त सत्र न्यायाधिश जयदीप मोहीते यांनी आरोपी जयत्री सुरेश गव्हाणकर आणि मयुर सुरेश गव्हाणकर, रा. बदलापुर ता. कल्याण, जि. ठाणे आरोपीस भा.द.वी. कलम ३५३, ३२३ व ५०६ नुसार दोषी ठरवुन त्यांस कलम ३५३ करता १ वर्ष, कलम ३२३ करता ३ महिने व ५०६ करता ६ महिने सश्रम कारवास, दंड अनुक्रमे प्रत्येकी रू. १०००/-, ५००/- आणि ८00/- अशी शिक्षा फर्मावली. याकामी पैरवी अधिकारी पो.हवालदार सचिन खैरनार व पो, शिपाई सिध्देश पाटील यांनी केस चालवताना मदत केली.

सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना त्यांचेवर होणाऱ्या हल्ल्यांना अशा निकालांमुळे आळा बसेल असे बोलले जात आहे.