प्रशासक सुरेखा भणगे यांच्याकडून ई – रिक्षाच्या चार्जिंग स्टेशनची पाहणी

surekha-bhangane.3
माथेरान (मुकुंद रांजाणे) : सर्वांनाच प्रतीक्षा असणाऱ्या ई रिक्षाची सेवा लवकरच उपलब्ध होणार असल्याने या बॅटरी वर चालणाऱ्या ई रिक्षाच्या चार्जिंग स्टेशनची पाहणी आज दि.२ रोजी नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे ( शिंदे ) यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी वर्गासह केली.यावेळी त्यांच्यासोबत नगरपरिषद अभियंता स्वागत बिरंबोले, आरोग्य विभागाचे सदानंद इंगळे, लेखापाल अंकुश इचके, कार्यालय अधीक्षक प्रवीण सुर्वे, रोखपाल राजेश रांजाणे,आरोग्य निरीक्षक अभिमन्यु येळवंडे आदी उपस्थित होते.
काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक ई रिक्षा केव्हा सुरू होणार याच प्रतीक्षेत होते. परंतु काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ लागल्याने थोडा उशीर झाला होता. एकूण चार ठिकाणी ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. मुख्य प्रवेशद्वार असणारा दस्तुरी नाका, रेल्वे स्टेशन जवळील कम्युनिटी सेंटर, सार्वजनिक वाचनालय आणि नगरपरिषदेच्या आवारात ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत.
ई-रिक्षासाठी लागणारे चार्जिंग स्टेशनचे काम सुध्दा जवळजवळ पुर्ण झालेले असून काही उणीवा राहू नयेत यासाठी सुरेखा भणगे संबंधित अधिकारी वर्गाला सूचना देऊन कामे पूर्ण करून घेत आहेत. काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध पर्यटक, नागरिक आणि रुग्णांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
ई रिक्षा साठी पर्यावरण पूरक असे क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांचे काम सनियंत्रण समितीच्या परवानगीनुसार लवकरच पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रशासक सुरेखा भणगे यासुद्धा आपल्या कामात काहीच कमी पडू देत नाहीत. त्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे या अत्यावश्यक सुविधेसाठीच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे.
ई -रिक्षाच्या सेवेमुळे रात्री अपरात्री येणाऱ्या पर्यटकांना त्याचप्रमाणे स्थानिक लोक सुध्दा रात्री उशिरापर्यंत दस्तुरी नाक्यावर येत असतात. त्यामुळे दस्तुरी पासून गावात येण्यासाठी आपल्या सामानासह,लहान लहान मुलांना घेऊन येणे खूपच त्रासदायक बनले होते. ई रिक्षाचा स्वस्त आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार असल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.
————————-
माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू होणार आहे ही गोष्ट खूपच आनंदाची असून यापुढे इथे जास्त प्रमाणात जेष्ठ,वयोवृद्ध, अपंग पर्यटक सुध्दा येतील.आमचे वयोवृद्ध नातेवाईक अनेकदा बोलून दाखवतात की, आमची माथेरान बघण्याची खूप इच्छा आहे पण इथे  वाहतुकीची स्वस्त दरात सोय उपलब्ध नव्हती ती आता ई रिक्षाच्या माध्यमातून भरून निघणार आहे.ई-रिक्षाचे आम्ही स्वागत करतो.
—नैना भारद्वाज, पर्यटक, नालासोपारा
————————-
ई-रिक्षा ची सेवा सोमवार ते गुरुवार सकाळी 6.30 ते रात्री 7 आणि शुक्रवार ते रविवारी सकाळी 6.30 ते रात्री 10 पर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे.यामध्ये शालेय विद्यार्थी, आबाल वृद्ध ,पर्यटक ,नागरिक, रुग्ण यांना याचा लाभ घेता येणार आहे.
 —सुरेखा भणगे (शिंदे), प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *