उरण (विठ्ठल ममताबादे ) : आज मराठी पत्रकार दिन आहे. मराठी पत्रकारितेची सुरवात 6 जानेवारी रोजी झाली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अल्पायुष्य लाभले मात्र या अल्पायुष्यातही त्यांनी भरीव अशी कामगिरी आपल्या जीवनात केली. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. आपल्या कला कौशल्याचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी जनतेसाठी, देश सेवेसाठी केला. स्वातंत्र्य काळात जनजागृती करण्यात पत्रकारांची, प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे.मात्र काळातंराने पत्रकारितेत बदल होत गेला पूर्वीसारखे स्वातंत्र्य आता पत्रकारांना नसल्याने पत्रकारांच्या, प्रसार माध्यमांच्या कार्यावर अनेक बंधनी आली आहेत .
आज पत्रकारांवर अनेक बंधने असल्याने पत्रकार मुक्तपणे लिखाण करू शकत नाही. ही वस्तू स्थिती आहे. अनेक प्रसारमाध्यमामध्ये खाजगी भांडवलदारांचा शिरकाव झाला आहे. मिडियाचे अनेक शेअर्स खाजगी भांडवलदार विकत घेत आहेत. खाजगीकरणामुळे व भांडवलदारा मूळे पत्रकारिता धोक्यात आली आहे. मात्र प्रसार माध्यमांमध्ये क्रांती घडविण्याची खरी ताकद आहे. आज जे पत्रकारांविषयी चुकीची भावना समाजात रुजत चालली आहे. ही भावना बदलायची गरज निर्माण झाली आहे. वृत्तपत्रात व्यवस्था बदलण्याची ताकद आहे क्रांती घडविण्याची ताकद प्रसार माध्यमामध्ये आहे. ही ताकद निश्चितच आहे ही ताकद सुधारली पाहिजे असे परखड व रोखठोक मत ज्येष्ठ पत्रकार जगदिश तांडेल यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून उरण मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या माध्यमातून उरण नगर परिषदेचे माँ साहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक वाचनालय उरण शहर येथे पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगदिश तांडेल यांनी पूर्वीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशी गदा येते. पत्रकारांना काम करताना कोणकोणत्या अडचणी येतात याविषयी जगदिश तांडेल यांनी आपले मनोगत व्यक्त करून आजच्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त केली. पत्रकारांना अल्प मानधन देऊन त्यांना राबवून घेतले जातात. पत्रकारांना अनेक समस्या आहेत मात्र त्या समस्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत त्यांनीही पत्रकारांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.त्यांनी शेवटी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उरण नगर परिषदेचे माँसाहेब मिनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष पवार, ग्रंथालय सहाय्यक जयेश वत्सराज, ज्येष्ठ पत्रकार जगदिश तांडेल , दिलीप कडू, उरण तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू , विरेश मोडखरकर, हेमंत देशमुख, श्रीधर पाटील , विठ्ठल ममताबादे आदि पत्रकार, संपादक उपस्थित होते. यावेळी वीरेश मोडखरकर, श्रीधर पाटील,संतोष पवार यांनीही पत्रकारितेबद्दल मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांच्यातर्फे पत्रकांराना पेन, गुलाबपुष्प देऊन पत्रकारांचा करण्यात आला. पत्रकारांचा सत्कार केल्याने सर्व पत्रकार, संपादकांनी संतोष पवार, जयेश वत्सराज यांचे आभार मानले.