फ्लॅटमधील फ्रिज जळला; अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता

पोलादपूर (शैलेश पालकर) : शहरातील प्रभातनगर पूर्व भागातील ओम अपार्टमेंटच्या ए विंग मधील एका फ्लॅटच्या भाडेकरूच्या फ्रिजला  रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये किचनमधील सामान जळून खाक झाले. जागरूक सेवाभावी नागरिकांनी तातडीने ही आग विझविण्यात यश मिळविले असले  तरी या घटनेने पोलादपूर शहरात नगरपंचायतीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.

पोलादपूर शहरातील प्रभातनगर पूर्व भागामध्ये  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रमेश सखाराम गाडे यांच्या फ्लॅट नंबर 101मध्ये सस्ते आडनावाचे शिक्षक भाडेकरू राहात असून त्यांच्या घरातील फ्रिजमध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे वायरिंग, फ्रिज, मिक्सर, फिल्टर, विंडोग्लास आणि किचनमधील सामान तसेच अन्य चीजवस्तु जळून खाक झाल्या. या घटनेची खबर कळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने उपस्थित राहिले. मात्र, तोपर्यंत काही समाजसेवी व्यक्तींनी तातडीने फ्रिजवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

या आगीच्या घटनेमुळे पोलादपूर नगरपंचायतीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असण्याची आवश्यकता स्पष्ट झाली असून तालुक्यातील काही घटनांमध्ये महाड येथून आलेल्या अग्निशमन यंत्रणांनी काम झाल्यानंतर बिलाची मागणी केल्यानंतर मोठया प्रमाणात आर्थिक कुचंबणा निर्माण झाल्याचे दिसून आले होते. पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी जंतूनाशक फवारणीकरिता आणलेल्या एका खास यंत्रणेचा वापर आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा म्हणून करता येऊ शकेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्या यंत्रासाठी पाण्याची टाकी असलेल्या वाहनाची गरज असल्याने अद्याप तशी कायम स्वरूपी तरतूद होऊ शकली नाही.

पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रातील अनेक अपार्टमेंटमधील रहिवाशांना तातडीची सीज फायरसदृश्य अग्निशमन सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रशासनाने सक्ती करण्याची गरज असून आपत्कालीन प्रशिक्षित स्वयंसेवी व्यक्तींचा प्रशिक्षणाचा कार्यक्रमदेखील यानिमित्ताने आयोजित करण्याची मागणी होऊ लागली आहे.