बोर्लीपंचतन (मकरंद जाधव) : श्रीवर्धन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या चाळीस गावांची मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर वेगाने विस्तार होणारे शहरवजा गाव बोर्लीपंचतन येथील परीवहन विभागाच्या बस स्थानकाची शेड सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या अतिक्रमण कारवाईत जमीनदोस्त झाल्याने गेले सात आठ महिने प्रवाशांना ऊन पावसात बसची वाट पाहत उभं रहावे लागत आहे.
त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास सुविधा व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस स्थानक शेड अभावी आरक्षण बंद झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची खूपच अडचण होत असून मासिक पास काढण्यासाठी त्यांना श्रीवर्धन बस आगारात जावे लागत असल्याने विनाकारण मानसीक, शारिरीक व आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या सुटणाऱ्या मुंबई,पूणे, मिरज, नालासोपारा यातील काही गाड्या या बोर्लीपंचतन मार्गे जातात त्याचबरोबर दिवेआगर या प्रसिध्द पर्यटन स्थळाला भेट देणारे पर्यटक यांनासुध्दा बोर्लीपंचतन येथुनच प्रवास करावा लागतो परंतू बस स्थानकात निवारा शेडच नसल्याने प्रवासासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरीक, महीला व लहान मुलांना उन्हामध्ये उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागते.शिवाय वेळापत्रक आणि वाहतूक नियंत्रक नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची चौकशी कुठे आणि कोणाकडे करायची ? अशा विविध समस्यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत प्रवाशांच्या या गैरसोयींकडे स्थानिक पत्रकारांनी लक्ष वेधले होते.
त्या अनुषंगाने बोर्लीपंचतन सरपंच ज्योती परकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच नंदकिशोर भाटकर, ग्राम पं.सदस्य, श्रीवर्धन आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड,चंद्रकांत धनावडे,नंदू पाटील,प्रदीप खोपकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीवर्धनचे उपविभागीय अभियंता तुषार लुंगे यांची सोमवार दि.५ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन या गंभीर समस्येबाबत चर्चा करुन ग्रामस्थांच्या मागणीनुसार जूने बस स्थानक ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी लवकरात लवकर निवारा शेड साठी जागा उपलब्ध होण्याची मागणी करुन सहकार्य करण्याची विनंती केली.
त्याला अभियंता तुषार लुंगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या विषयाचा वेगाने पाठपुरावा करुन प्रवाशांना होत असलेला मनस्ताप दूर होण्यासाठी लोक प्रतिनिधींनीसुध्दा सकारात्मक निर्णय घेऊन बस स्थानकाच्या निवारा शेडची प्रतिक्षा लवकरच संपवावी असा आशावाद ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
————————————-
प्रवासी व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार श्रीवर्धन त्याचबरोबर आगार व्यवस्थापक यांच्याजवळ कायदेशीर बाबींवर चर्चा करुन ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रस्तावावर काही अटी शर्तीवर तात्पुरत्या स्वरुपात बोर्लीपंचतन बस स्थानकाच्या निवारा शेडचा विषय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सोडवण्यासाठी प्रयत्न करेन.
—तुषार लुंगे,
उपविभागीय अभियंता
सा.बां.उप विभाग श्रीवर्धन