पेण (राजेश प्रधान) : पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण,रायगड येथे शनिवार,१०डिसेंबर २०२२ रोजी ‘ आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधुन D.L.L.E Unit चे रायगड जिल्हा समन्वयक प्रा. देवीदास शिवपुजे यांच्या ‘मानवाधिकाराचे महत्व ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदानंद धारप, विविध शाखांचे प्राध्यापक तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर D.L.L.E Unit चे समन्वयक डॉ देवीदास बामणे यांनी प्रत्येक मानवाला त्याची माणूस म्हणुन असलेली प्रतिष्ठा आणि माणूस म्हणून असलेले न्याय्य हक्क मिळवून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली ,त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत त्यांना शब्दरूपी आदरांजली वाहिली.
यानंतर प्राचार्य डॉ सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात मानव म्हणजे काय हे सांगत मानवाधिकार दिवस साजरा करण्याची वेळ यावी ही खेदाची बाब आहे, आपल्याला फक्त आपले हक्क हवे असतात.कर्तव्याकडे आपण कानाडोळा करतो. पण जर आपलं काम आपण प्रामाणिकपणे केले तर हक्क मागण्याची वेळ आपल्यावर येणार नाही ,असे सांगितले.माणसाने मानवी देह, इभ्रत याची जपणूक करणे म्हणजे मानवाधिकार होय.जागृतपणे जगा,मानवाधिकार आपोआप जोपासले जातील असं प्राचार्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर प्रमुख वक्ते प्रा.शिवपुजे यांनी माणूस म्हणून जगताना आपल्यातील क्षमतांचा विकास करत माणसाने माणसाशी माणुसकीने वागत स्वत:मधील माणूस जपण्याचा प्रयत्न करा.दुसऱ्याचं शुभ चिंता म्हणजे आपोआप तुमचं भलं होईल ,असं सांगितलं.यानंतर सरांनी D.L.L.E Unit च्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.विशेष कौतुकाची बाब म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते.सूत्रसंचालन विद्यार्थि प्रतिनिधि कु.कीर्ती उके हिने तर आभार प्रदर्शन कु.सायमा मुजावर हिने केले.