आज फेसबुकवर नेहमी प्रमाणे वेळ घालवताना एकाशी ओळख झाली. बोलायला तो मुलगा चांगला वाटला. बोलता बोलता आमची चांगली गट्टी जमली. अगदी एकमेकांना चिडवण्या एवढ्या छान गप्पा झाल्या. तो मुलगा इंजिनियरिंग करतो आणि माझ्या माझा मामेभाऊ सुद्धा इंजिनियरिंग पास झाला ह्या वर्षी… त्यामुळे त्याच्या बद्दल मला अगदी भावासारख्याच भावना होत्या. जसं मी मामेभावाशी गप्पा मारते. त्याला चिडवते. तसंच मी त्यालाही चिडवले. हा थोडासा रुसला. मग मी त्याला मोठ्या बहिणी सारखं मनवले आणि त्या सगळ्यात त्याला एक बहिण आणि मला हा एक भाऊ मिळाला.
आता बहिण-भाऊ म्हंटल्यावर थोडी फार पर्सनल चर्चा होतेच. जसं घरी कोण असतं, तू काय करतोस वगैरे… हे सगळं बोलणं झाल्यावर अचानक त्याने मला एक वेगळाच प्रश्न विचारला…
“ताई, तुझी जात कोणती?””
प्रश्न खरं तर खूप साधा होता आणि त्याचं उत्तर ही तसं साधंच होत. माझी जात – जी माझ्या आडनावावरून, ह्या पूर्ण समाजानी ठरवून दिलेल्या नियमांनुसार – माझी जात ठरते.
मनात विचार आला, मी जन्माला आले तेव्हा फक्त एक शरीर होते, मग ह्या समाजातल्या लोकांनी माझं बारसं केलं. मला नाव दिले. माझी ओळख दिली. मी जशी मोठी होत गेले, माझ्यात संस्कार भरले. शाळेतल्या शिक्षकांनी मला ज्ञान दिले. मिळून मिसळून वागायला शिकवले. मित्र-मैत्रिणींनी आणलेला डबा वाटून खायला शिकवले. आयुष्यात मिळणाऱ्या अनुभवांनी माणूस म्हणून जगायला शिकवले. पण कधी कोणी मला जात विचारायला नाही शिकवले.
वर्गात जेव्हा दहा-बारा जण फरशीवर बसून डबा खायचो तेव्हा आपल्या डब्यात हात घालून खाणाऱ्या त्याची जात विचारायला कोणी नाही शिकवले किंवा दुसऱ्याच्या डब्यात माझ्या आवडीचे पदार्थ असताना सुद्धा त्याची जात वेगळी म्हणून खायचे नाही असे कोणीही नाही शिकवले.
जात म्हणजे नक्की काय असतं हे शाळा सुटल्यावर समजले. पण तेव्हा ही ते फक्त कागदावर लिहिण्या पुरते! मैत्री तेव्हा हि चांगल्या मनाच्या माणसांचीच होत होती. तेव्हा कोणी व्यक्ती स्वभावानी, बुद्धिनी आणि विचारांनी चांगली वाटली तरच मैत्री व्हायची. अशा चांगल्या व्यक्तीची जात वेगळी आहे म्हणून कधी कोणी त्या व्यक्तीला टाळायला नाही शिकवले.
आजही दहावी-बारावी मध्ये जी मुले हुशार आहेत, बुद्धिमान आहेत अशाच मुलांना प्रथम, द्वितीय क्रमांक मिळतात. तेव्हा महत्व त्यांच्या बुद्धीला असते. जातीला किंवा पैशाला नाही. कित्येकदा आपण बातम्या वाचतो, आई-वडिलांकडे घर चालवायला, फी भरायला पैसे नसणारे मुलं-मुली सुद्धा राज्यात प्रथम क्रमांकावर येतात. तेव्हा त्यांना योग्य तो मान मिळतोच ना!
ज्यांनी आयुष्यात काहीच केले नाही, त्यांची जात काय? ज्यांनी स्वतःच्या पूज्य आई-वडिलांचे नाव मोठे केले, स्वतःच्या देशाचे नाव मोठे केले, त्यांची जात काय? कैशल्य नावात नसतं, ते नाव ज्या देहाला, ज्या शरीराला मिळालेले आहे, त्याचे महत्व असते. कोणाचे शरीर इतके सुदृढ असते कि ती व्यक्ती ऑलिंपिक मेडल देशासाठी आणू शकते. कोणाचा आवाज इतका छान असतो कि, परदेशात सुद्धा त्या व्यक्तीचे फॅन – चाहते असू शकतात. कोणी इतके सुंदर असते कि, ‘मिस वर्ल्ड’ म्हणून प्रसिद्धी होते. सांगण्याचा मुद्दा हा कि, जर तुमच्यात कौशल्य असेल तर तुम्ही परदेशातही आपल्या देशाचे नाव मोठे करू शकता.
मग अशा ह्या मोठ्या देशात जिथे सगळीकडे तुमच्यातल्या चांगल्या गोष्टीला वाव दिला जातो, तिथे तुम्हाला जाती सारख्या छोट्या मुद्यावर लक्ष देऊन काय मिळणार?
आणि म्हणूनच माझ्याही नकळत, मी त्या मुलाला माझी जात सांगितली “भारतीय!”
कारण अजूनही माझी ओळख फक्त एवढीच आहे.
“भारतीय!”
- के. एस. अनु.