भारत-नेपाळमध्ये १७ ऑगस्टला होणार चर्चा, सीमा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता

नवी दिल्ली :  भारत-नेपाळ या दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी १७ ऑगस्टला नेपाळची राजधानी काठमांडू येथे, भारत-नेपाळमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नेपाळकडून परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी, तर भारताकडून नेपाळमधील भारताचे राजदूत विनय क्वाटरा बोलतील.

दोन्ही देशांमधील या चर्चेला नियमित काळाने होणाऱ्या आर्थिक आणि विकासाशी संबंधित मुद्यांवरून होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत विकास योजनां सोबतच सीमावादाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

नेपाळने आपल्या नवीन राजकीय नकाशामध्ये भारताचा काही भाग दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. यावर भारताने आक्षेप देखील घेतला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी यावर म्हटले होते की, आमची भूमिका स्पष्ट आहे. नेपाळच्या या दाव्याच्या बाजूने कोणतेही ऐतिहासिक तथ्य किंवा पुरावा नाही.