मंत्रालयात आयएनएस विक्रांत युद्धनौकेची प्रतिकृती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले प्रदर्शनाचे उदघाटन

pratikruti
पनवेल (संजय कदम) : नौदलाचा बाहुबली, देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूच्या उरात धडकी भरणाऱ्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वाना अवगत व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या युध्द जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून आज (दि. १२) राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
संस्कार भारती (कोकण प्रांत) व ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’च्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे दिनांक १३ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने मंत्रालयाच्या नवीन इमारतीत त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे केंद्रीय संरक्षक राजदत्त, राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत, ज्येष्ठ कलाकार आणि संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष सुनिल बर्वे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय शिरसाट, ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, नेव्ही फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी कमांडर विजय वडेरा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्कार भारतीचे महामंत्री अँड. अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयएनएस विक्रांत हे आताचे जहाज भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणारी आहे. देशाची पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. याची माहिती सर्वांना पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला.
मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं विविध कामाच्या अनुषंगाने येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात पनवेलमध्ये जन्म झालेली आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती प्रदर्शनाच्या रूपाने मांडण्यात आली आहे.
या उपक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. आणि या प्रदर्शनातून आयएनएस विक्रांत युद्धनौकेची महती सर्वदूर पोहोचेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *