पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध जाहिर झाल्याने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पैशांचा चुराडा टळल्याची चर्चा सर्वत्र होत असून आता बिनविरोध जाहिर झालेल्या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षांची सत्ता याबाबतचे दावे खोडण्याचे राजकीय सत्र सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने तालुक्यात याप्रकारचे दावे प्रतिदावे यापुढील काळात सातत्याने सुरू राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर त्यापैकी गोळेगणी, कापडे खुर्द, कोतवाल बुदु्रक, कोतवाल खुर्द, ओंबळी, पैठण, पार्ले व परसुले या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसह निवड बिनविरोध झाली आहे.
कोतवाल बुद्रुकमध्ये रेखा दळवी बिनविरोध सरपंच
तालुक्यातील मातब्बर नेते भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या मुळगावाची ग्रामपंचायत असूनही ग्रामविकास समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत बिनविरोध जाहिर झाली आहे. यामध्ये रेखा दळवी यांची थेट सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून प्रभाग 1 मधून मनोहर कदम, साक्षी पार्टे आणि प्रतिभा दरेकर प्रभाग 2 मधून महेश दरेकर आणि आशा कदम प्रभाग 3मधून राजेश कदम आणि चंदा पवार आदी 7 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या गावपातळीवरील बिनविरोध निवडीवेळी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान संधी देण्यात आली आहे.
कोतवाल खुर्द अविनाश शिंदे बिनविरोध सरपंच
पोलादपूर तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या कोतवाल खुर्द ग्रामपंचायतीमध्ये अविनाश शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून प्रभाग 1 मधून सुप्रिया सकपाळ, सीमा शिंदे, तुकाराम पवार, प्रभाग 2 मधून नामदेव शिंदे, सुभद्राबाई मोरे, प्रभाग 3मधून बबन शिंदे आणि मंदा सकपाळ आदी 7 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
कापडे खुर्द संदीप काळे थेट सरपंचपदी बिनविरोध
महाबळेश्वर रस्त्यावरील कापडे खुर्द ग्रामपंचायतीची सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध होऊन संदीप प्रकाश काळे यांची सरपंच पदी निवड झाली आहे. प्रभाग 1 मधून पुष्पा चोरगे, रंजना कदम, कुंदा मोरे प्रभाग 2 मधून सोपान निकम, दिपाली मोरे, प्रभाग 3मधून राणी जाधव आणि शोभा कदम आदी 7 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
परसुले थेट सरपंचपदी रमेश शिंदे
पोलादपूर तालुक्यातील प्रस्तावित धरणप्रकल्प असलेल्या परसुले ग्रामपंचायतीमध्ये रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 1 मधून सारिका जाधव, अश्विनी दळवी, रोहन मोरे, प्रभाग 2 मधून गीता जाधव व रिक्त, प्रभाग 3मधून विलास जाधव व रिक्त आदी 5 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
पार्ले थेट सरपंच आशा पवार बिनविरोध
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील मुंबईकडून पहिली ग्रामपंचायत असलेल्या पार्ले गावामध्ये यंदा बिनविरोध ग्रामपंचायत होण्यासाठी प्रयत्न यशस्वी झाले. आशा पवार यांची बिनविरोध थेट सरपंचपदी निवड झाली. प्रभाग 1 मधून भीमराज शिंदे, नीता कदम, सुनीता मोरे, प्रभाग 2 मधून रिना जाधव व रिक्त, प्रभाग 3मधून अनिता वाघे आणि विलास वाघे आदी 6 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पैठण दाव्यासह प्रतिदावे शीतल येरूणकर सरपंच
पैठण, गोळेगणी आणि परसुले धरणाचा नारळ फुटल्यानंतर या तीनही ग्रामपंचायती कोणाकडे हा दावा खोडण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला. या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदावर शीतल येरूणकर यांची निवड बिनविरोध झाली. प्रभाग 1 मधून शारदा मोरे, सुनीता सावंत, अरूण दरेकर, प्रभाग 2 मधील दोन्ही जागा रिक्त, प्रभाग 3 मधून अंकिता मोरे आणि सचिन मोरे आदी 5 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध परंपरा ओंबळी थेट सरपंच रूपाली चिकणे
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड करण्याची सुमारे 50 हून अधिक वर्षांची परंपरा यावेळीदेखील कायम राहिली असून थेट सरपंचपदी रूपाली चिकणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 1 मधून निवृत्ती चिकणे, नंदा चिकणे आणि सविता ढेबे, प्रभाग 2 मधील लक्ष्मण चिकणे आणि मंगल चिकणे, प्रभाग 3 मधून सखाराम चिकणे आणि नंदाबाई चिकणे आदी 7 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
गोळेगणी सरपंचपदी प्रकाश दळवी बिनविरोध
पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून प्रकाश दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग 1 मधून नम्रता येरूणकर, दिपाली सुर्वे आणि ज्ञानेश्वर मोरे, प्रभाग 2 मधील प्रियंका भोसले आणि शेखर येरूणकर, प्रभाग 3 मधून मंगला उतेकर आणि प्रभाकर पवार आदी 7 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सोशल मिडीयाद्वारे दावा सांगितला असताना प्रत्यक्षामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनही थेट सरपंचपदांवर दावे करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर गावसमितीने या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केल्याचे गावातील ज्येष्ठ बुजूर्ग लोक सांगत आहेत.