महाड : महाड शहरातील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युनुस अब्दुल रज्जाक शेख ( रा खारकांड मोहल्ला ) याला शहर पोलिसांनी आज सकाळी दहा वाजता त्याच्या घरातून अटक केली. आता या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
२४ ॲागस्ट राजी सायंकाळी साडेसहा वाजलेच्या सुमारास शहरातील काजळपुरा येथील तारीक गार्डन ही केवळ सात वर्षांपुर्वी बांधलेली, पाच मजली ४३ सदनीकांची इमारत कोसळून सोळा रहिवाशांचे बळी गेले होते, तर नऊ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी या इमारतींचा बिल्डर फारूक महामुदमिया काझी ( रा तळोजा ) याच्यासह आर सी सी कंन्सलटंट बाहूबली धामणे, आर्कीटेक्ट गौरव शहा (नवी मुंबई), नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम पर्यवेक्षक या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी आर सी सी कंन्सलटंट बाहुबली धामणे याना अटक केली होती. त्यानंतर पोलीस तपासात युनुस शेख याचाही या इमारत बांधकाम व व्यवहारांशी संबंध असल्याच्या याइमारतीच्या रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर युनुस शेख यालाही पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांनी आज सकाळी अटक केली.
युनुस शेखला आज दुपारी न्यायालयात हजर केली असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी महाड दिवाणी न्यायालयाने सुनावली आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी बिल्डर फारूक काझी याच्यासह अन्य चार आरोपी फरारी असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . केवळ निकृष्ट बांधकामामुळेच ही इमारत कोसळली असल्याचे स्पष्ट होत असून यामधील आरोपींची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे . या इमारतीतील रहिवासी असलेले ४३ कुटुंबे ही इमारत कोसळल्यामुळे बेघर झाली असून या सर्वांचे संसार अक्षरश: उघड्यावर पडलेले आहेत.