अलिबाग : महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 39 तासांनी एनडीआरएफ जवानांनी शोध आणि बचावकार्य थांबविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिली. या दुर्घटनेत एकुण 16 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30वाजता च्या सुमारास ही 45 सदनिकांची 5 मजली इमारत कोसळली होती.
घटनेच्या पहिल्या दिवशी सोमवारी रात्री एकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारी दुसर्या दिवशी उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ढिगार्यातून 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाची ओळख पटली नव्हती. आता त्याची ओळख पटली असून मतीन मुकादम (45) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर बुधवारी हबीबा दाऊद हसवारे (80), कामरुनीसा अन्सारी (63) या दोघांचे मृतदेह ढिगार्यात सापडले. या दुर्घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.
बिल्डरविरोधात संताप
या दुर्घटनेला जबाबदार ठरवलेल्या 5 जणांपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने याला पोलिसांनी कळवा, ठाणे येथून बुधवारी सकाळी पावणेपाचच्या सुमारास अटक केली. माणगाव न्यायालयाने त्यास 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोकांमध्ये या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरविरोधा प्रचंड संताप आहे. उद्ध्वस्त झालेला संसार पाहून दु:खी झालेल्या रहिवाशांना संतापही अनावर झाला होता. रहिवासी आणि त्यांच्या नातेवाइकांनी आक्रोश करत बिल्डरला फासावर लटकवण्याची मागणी केली.