महाड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

महाड :  महाड येथील सिस्केप या संस्थेच्या वतीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गिर्यारोहण साहस, बचावकार्य आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ४० तरुणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

शनिवारी महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप आणि मुख्याधिकारी  जीवन पाटील यांच्याउपस्थितीत महाड नगरपालिकेच्या अग्नीशमन केंद्रात, या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेचे सदस्य सुनील गायकवाड, आनंद गावडे, रोहीत वर्तक आणि गणेश गिध हे या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यशाळेत शनिवारी गिर्यारोहण साहित्य ओहख व उपयोग, वैयक्तिक संरक्षण साहित्य ओळख व उपयोग, रोप नॉट आणि अँकरिंग, स्ट्रेचर पॅकिंग (प्रथमिक उपाय योजना) यांची माहिती देण्यात आली. तर रविवारी आपत्ती व्यवस्थापन प्रत्यक्षिके घेण्यात आली.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी चिंतन वैष्णव, योगेश गुरव, प्रेमसागर मेस्त्री, डॉ. राहुल वारंगे यांच्यासह सिस्केप सदस्यांनी मेहनत घेतली.