उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील कोप्रोली येथे असलेल्या ग्लोबीकॉन टर्मिनल कंपनीच्या मुजोरीविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत गेट बंद आंदोलन पुकारले होते. दुसऱ्या दिवशी कंपनी व्यवस्थापन आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणण्यात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली.
पनवेल येथे डीसीपी शिवराज पाटील , माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कामगार नेते अॅड. सुरेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, शेतकरी प्रतिनिधी रूपेश पाटील, मधुकर पाटील यांच्यासह ग्लोबीकॉन कंपनी व्यवस्थापक थॉमस जेकब, एच आर समता जैन यांच्यात बैठक पार पाडली. या बैठकीत दोन्ही बाजूने जोरदार चर्चा झाली. अॅड. सुरेश ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने व्यवस्थापनाला धारेवर धरले. तर शेतकरी प्रतिनिधी रूपेश पाटील मधुकर पाटील यांनीही शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप होत होते.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कंपनी संचालक अनिकेत छेडा, नित्यम खोसला यांचेशी संपर्क केला व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. मे महिन्या अखेर 15 लोकल कामगारांची भरती करण्याचं त्यांनी मान्य करत अन्य मागण्या डिसेंबर पर्यंत सोडवणार असल्याचे त्यांनी कबूल केले. याबाबत येत्या चार पाच दिवसांत संचालक मंडळाबरोबर बैठक होणार असल्याने तूर्त हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेली दोन दिवस शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबतीत रुपेश पाटील, रोहिदास पाटील, मधुकर पाटील, सुजीत पाटील, महेश म्हात्रे, योगेश म्हात्रे, भूषण ठाकूर, कमलाकर पाटील, राकेश गावंड, विज्ञान पाटील, विश्वास ठाकूर आदींसह शेतकरी महिला आक्रमक होत्या. गेली दोन दिवस प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या या आंदोलनाला भेट दिलेल्या प्रत्येकाचे आभार यावेळी मानण्यात आले.