लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होते.१९८५ ते ८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजीराव निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला असला तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.
एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला होता. त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते.
वैद्यकीय नियम व निकषानुसार इतरांना त्यांच्या संपर्कात येऊ दिले जात नव्हते. दरम्यान, उपचाराच्या वेळी निलंगेकर कुटूंबिय व त्यांचे निकटवर्ती माधवराव माळी वेळोवेळी डाॅक्टारांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते. लातूरहून पुण्याला हलवल्यानंतर ते कोरोना विरुध्दची लढाई निश्चितच जिंकतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता. मानसिकदृृष्ट्या ते खंबीर असल्याने कुटुंबियाचा हा विश्वास काही काळ खराही ठरला.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा १६ जुलै रोजी लातूर येथील खाजगी रुग्णालयात कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यानंतर कुटूंबियानी पुढील उपचारासाठी निलंगेकर यांना पुण्याला हलवले होते. त्यांचे चिरंजिव प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, डाॅ. शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर हे देखील दरम्यानच्या काळात क्वारंटाईन होते.
उपचार सुरू असतांनाही ते निलंग्यातील कोरोना विषयी परिस्थितीची विचारपूस सातत्याने करायचे.अगदी लातूरहुन निघण्यापूर्वीसुध्दा ते मोबाईलवरून अधिकार्यांशी बोलले होते.