माणगांव (रविंद्र कुवेसकर) : माणगांव नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांना निजामपूर येथिल जे.टी.एल बी.आर.डब्लु पाईप कंपनीतुन शुक्रवार दि.२ डिसेंबर दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली असल्याचा कंपनी मॅनेजरचा फोन येताच, ही आग विझविण्याच्या कामी पहिल्यांदाच माणगांवच्या अग्निशमन दलात समाविष्ट झालेली शीघ्र प्रतिसाद गाडी आपला सायरन (भोंगा) वाजवीत शिघ्रतेने निजामपूरच्या दिशेने आपल्या ८ कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाल्याची माहीती नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली. रोहा एमआयडीसी अग्निशमन दल त्यांचे अग्निशमन गाडीसह घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही दलांनी एकत्रीत ही आग विझवली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, निजामपूर येथील जेटीएल पाईप कंपनी बाहेरील गवताने अचानक पेट घेतला व ही आग पसरत कंपनी बाहेरील मटेरियलने देखिल पेट घेतला. कंपनी बाहेरील पत्र्याची शेड जळु लागली. नगरपंचायत चे सिटी कॉर्डिनेटर अतुल जाधव, कर्मचारी दशरथ गावडे, शशी मराठे, प्रकाश मोरे, अविनाश पाटील, महेंद्र मोरे, चंद्रकांत सोंडकर, महेंद्र मढवी, वैभव कोळी, बबन जाधव या आठ जणांच्या टीमसह माणगांव येथुन दहा मिनीटात घटनास्थळी पोहचुन प्रसंगावधान राखीत अग्निशमन गाडीच्या होज पाईप यंत्रणेचा वापर करीत पाण्याचा जोरदार फवारा मारुन अर्धा पाऊण तासात ही आग विजविण्यात यश मिळविले. यामुळे संभाव्य मोठी हानी टळली आहे.
माणगांवच्या नवख्या कर्मचाऱ्यांना रोहा एमआयडिसी अग्निशमन दलाने फायर फायटींगची माहीती देत मदत केली आहे. आपल्या नगरपंचायतीस अग्निशमन फायर फायटींग ट्रेनिंगची नितांत गरज असुन आज अचानक लागलेल्या आग विझविण्याचे मदत कार्यात तत्परतेने कर्मचाऱ्यांनी नव्या यंत्रणेची माहीती नसतानाही चांगला वापर केला.
भविष्यात मोठी आग दूर्घटना घडल्यास नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच विरोधी पक्षाचे सर्व सदस्यांनी आपल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना देखिल अग्निशमन दृष्टीकोनातुन सुसज्ज प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुसज्ज यंत्रणा उपलब्ध आहे पण प्रशिक्षीत कर्मचारी ही आवश्यक आहेत. अन्यथा प्रसंगी ही यंत्रणा कुचकामी ठरु शकते.