माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान मध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक पर्यटन पूरक विकास कामे सुरू आहेत ज्यामुळे माथेरानच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे येथील वाहतूक व्यवस्थेचे मोठा बदल झाल्याने पर्यटकांची उत्तम सोय होत असल्याने येणारे पर्यटक एक चांगला अनुभव घेऊन जाताना दिसत आहेत.
माथेरानमध्ये अनेक वर्षापासून दगड मातीच्या लाल रस्त्याने पर्यटकांना भुरळ घातली होती परंतु या रस्त्यांवरून उडणाऱ्या मातीने स्थानिकांना अनेक श्वसन विकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यामुळेच येथील नागरिकांनी पर्यावरण पूरक धूळ विरहित रस्ते असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी केली होती व त्यास यश येत माथेरान सनियंत्रण समितीने येथील दगड मातीच्या रस्त्यांकरिता पर्यावरण पूरक क्ले पेवर ब्लॉक हा पर्याय सुचविला होता व त्यानुसार येथील बहुतेक रस्ते ब्लॉक ने बनविण्याचे काम सुरू आहे त्यामुळे येथील व्यवसायिकांना धुळीपासून सुटका मिळालीच आहे परंतु रस्ते ही स्वच्छ व चकाचक असल्याने पर्यटकांचे समाधान होत आहे. लीद मिश्रित माती जंगलामध्ये मिळत असल्याने येथील वनसंपदा ही धोक्यात आली होती तिलाही संरक्षण मिळाले असून रस्त्यालगत असलेल्या लहान मोठ्या झाडाझुडपांनाही संरक्षण मिळाले आहे व ही झाडे हिरवीगार झालेले दिसून येत आहेत.
माथेरानच्या पर्यटनामध्ये सर्वात मोठा बदल झालेला रिक्षाच्या स्वरूपातून आपणास पाहावयास मिळाला बॅटरीवर चालणाऱ्या या रिक्षांमुळे प्रदूषण तर होत नाही पण पर्यटकांना स्वस्त व जलद प्रवास होत असल्याने पर्यटकांची रिक्षा ही पहिली पसंती ठरत आहे त्यामुळेच ही रिक्षासाठी लांबच्या लांब रांग दिसून येतात माथेरान मध्ये सध्या मिनी ट्रेन ही पूर्ण ताकदीनिशी धावत आहे नेरळ हून सुटणाऱ्या नेरळ माथेरान साठी दोन गाड्या नेहमीच फुल धावत असल्याने पर्यटकांची मिनी ट्रेन पहिली पसंती ठरत आहे. तर आम्हाला अमन लॉज ते माथेरान या दरम्यान धावणाऱ्या शटल सेवेस ही पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे मुळे तोट्यात असलेली मध्य रेल्वे सेवा ही फायद्यात आल्याने याकडे रेल्वे प्रशासन जातीने लक्ष देत असल्याने पर्यटकांना एक चांगली सुविधा रेल्वेच्या स्वरूपाने मिळत असल्याने येणारे पर्यटकही खुश आहेत.
आता फक्त पर्यायी रस्ता व वाहनतळ यांच्यामध्ये सुधारणा झाल्यास माथेरानमध्ये पर्यटक वाढीस मदत होणार आहे नेरळ माथेरान रस्त्याला नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीस पर्यटकांना सामोरे जावे लागते तर अपुरी वाहनतळ व्यवस्थेमुळे पर्यटकांचा खूप वेळ वाया जात असल्यामुळे माथेरान करिता पर्यायी वाहतूक सुसज्ज मार्ग व वाहनतळ व्यवस्था असावी अशी मागणी माथेरान करांची आहे.