धक्कादायक! माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचं निधन

पेण : मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनानं निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जतच्या रूग्णालयात नेण्यात आले.

मात्र व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात येत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.. त्यांच्या जाण्याने रायगडच्या पत्रकारितेला मोठा धक्का बसला आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख साहेब यांनी आपल्या अत्यंत लाडक्या पत्रकाराला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांचे आज वयाच्या 52व्या वर्षी आकस्मित निधन झाले.शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून कर्जत येथून पनवेल येथे नेले जात असताना त्यांना श्वास घेण्यासाठी लावलेला ऑक्सिजन सिलेंडर संपला आणि शासनाच्या व्यवस्थेचा संतोष पवार बळी ठरले.दरम्यान,निर्भीड पत्रकार आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कार्यपद्धती असलेले पवार यांची मराठी पत्रकार सृष्टीत ओळख होती.दरम्यान,त्यांच्या जाण्याने तरुण पत्रकारांचा मोठा आधार हरवला आहे.
प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथील स्वातंत्र्यसैनिक धोंडू पवार यांचे संतोष पवार हे पुत्र.आपल्या मामाकडे पनवेल येथे शिक्षण घेतलेले संतोष पवार यांचे क्रिकेट खेळात विशेष नैपुण्य होते.त्यांनी आपल्या कॉलेज टीम मधून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या आहेत.त्यांनी 1992 मध्ये पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दैनिक सकाळ मध्ये माथेरान डेट लाईन वरून आपली पत्रकारिता सुरू केली.
अनेक वृत्तसंस्था यांच्याशी संबंधित असलेले संतोष पवार यांनी माथेरान मध्ये राहून कोणतीही साधने नसताना केलेली पत्रकारिता हा पत्रकारांसाठी मैलाचा दगड होता.माथेरान मधील एकही विषय नाही की तो त्यांनी आपल्या हातात असलेल्या वृत्तपत्रात मांडला नाही.माथेरान च्या समस्यांना देशाच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे सर्व श्रेय संतोष पवार यांना जाते.माथेरान मधील त्यांचे सामाजिक योगदान यामुळे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेत त्यांना स्वीकृत सदस्य करण्यात आले.
25वर्षे पत्रकारितेत कठोर परिश्रम घेतल्यानंतर संतोष पवार यांनी 25वर्षात साथ देणाऱ्या आपल्या मित्रांना एकत्र आणले होते.या कालावधीत त्यांनी शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर चार वर्षे काम केले,तर मराठी पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेत त्यांनी सरचिटणीस पदावर काम केले होते,तर रायगड प्रेस क्लबमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले असून रायगड प्रेस क्लबमध्ये कुटुंबप्रमुख म्हणून त्यांना मान होता.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त आणि हुतात्मा स्मारक समिती,क्षत्रिय मराठा समाज,मराठा सेवा संघ,आदी संस्थांवर त्यांनी काम केले आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या स्वतःचे वेब पोर्टल सुरू केले आणि सुरुवातीला रायगड जिल्हा, त्यानंतर कोकण आणि आता राज्यात त्या वेब पोर्टलचा पसारा वाढविला होता.कोकणातील सर्वात लोकप्रिय वेब पोर्टल म्हणून त्यांच्या चॅनेलचा लौकिक त्यांनी मिळविला होता.त्यांचे अत्यंत जिवलग मित्र असलेले दयानंद डोईफोडे हे असेच अचानक सोडून गेले होते आणि अगदी त्याहून भयाण मृत्यू संतोष पवार यांच्या रूपाने सर्वांनी पाहिला.आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट काळात सोबत असणारे पवार यांना आपल्या स्वतःच्या मृत्यूची चाहूल देखील लागली नाही आणि अवघ्या काही तासात ते सोडून गेले.
संतोष पवार गेली 10 वर्षे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नेरळ येथे राहत होते.तर आपल्या कामाच्या निमित्ताने पुणे,कर्जत,नवी मुंबई, बदलापूर,डोंबिवली आणि ठाणे येथील कार्यालयात त्यांच्या सतत फेऱ्या सुरू असायच्या.अभियंता झालेला मुलगा आणि मेडिकलची तयारी करणारी मुलगी असा परिवार असलेल्या संतोष पवार यांचे धाकटे बंधू यांना ऐन गणेशोत्सव सुरू असताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता.त्यानंतर मध्यरात्री माथेरान येथून खाली नेरळ येथे आणून आणि पुढे बदलापूर आणि नंतर नवी मुंबईत उपचार सुरू होते.
तेथे उपचार घेत असताना त्यांच्या बंधू ला कोरोना ची लागण झाली होती आणि आपल्या दोन्ही आजारावर मात करून त्यांचे बंधू दोन दिवसांपूर्वी घरी परतले होते.मात्र आपल्या बंधू च्या सुश्रुयेत कायम सोबत असलेले संतोष पवार यांना कोरोना चे भय वाटले नाही.मात्र लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि चिंता करणारे संतोष पवार हे स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष द्यायला कमी पडले.
9 सप्टेंबर रोजी पहाटे त्यांना जोरजोरात खोकला येऊ लागला आणि त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.त्यामुळे त्यांनी सकाळी आपले सहकारी दर्वेश पालकर यांना फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेण्यास सांगितले.त्यावेळी तुंगेकर रुग्णवाहिकेतून त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.तेथे त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 40च्या खाली आले होते.त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी तात्काळ संतोष पवार यांना ऑक्सिजन लावले आणि तासाभरात ऑक्सिजन पातळी 54 पर्यंत नेली.
परंतु त्या काळात माजी आमदार सुरेश लाड तसेच त्यांचा मित्र परिवार उपजिल्हा रुग्णालयात पोहचला होता.डॉक्टरांनी पवार यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना कोरोनाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ हलवले पाहिजे असे सुरेश लाड यांना सूचित केले.शासनाच्या वतीने एमजीएम रुग्णालयात तर पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी डी वाय पाटील मध्ये बेड आरक्षित करून ठेवला, त्याचवेळी सुरेश लाड हे नवी मुंबईतील रुग्णालयात बेड उपलब्ध होतो का? ते पाहत होते.
सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांना कर्जत येथून शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून पनवेल कडे नेण्यास सुरुवात झाली.मात्र त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी 50च्या आसपास असताना डॉक्टरांनी अर्धवट संपलेला सिलेंडर मधून ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली.मात्र रुग्णवाहिका कर्जत-चौक रस्त्यावरील भिलवले फाटा येथे असताना त्या सिलेंडर मधील ऑक्सिजन संपले.त्यामुळे रुग्णवाहिकेत असलेल्या महिला डॉक्टर यांनी सिलेंडर बदलण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांना ते जमले नाही आणि डॉक्टरांनी शेवटी रुग्णवाहिकेचे चालक यांना ही माहिती दिली.
रस्त्यावर रुग्णवाहिका बाजूला उभी करून चालकाने ऑक्सिजन सिलेंडर बदलण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यावेळी त्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि किमान 10 मिनिटे ऑक्सीजन पुरवठा बंद झाल्याने संतोष पवार यांनी तेथेच धापा टाकण्यास सुरुवात केली.रुग्णवाहिकेच्या मागे असलेल्या त्यांच्या मित्रांनी रुग्णवाहिका येथे थांबवण्याची गरज नाही,पुढे घेऊन चला अशी सूचना केल्याने 108 क्रमांकाची सुसज्ज रुग्णवाहिका चौक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आली. तेथे डॉक्टरांनी संतोष पवार यांची तपासणी केली असता त्यांचे निधन झाले असे जाहीर केले.
शासनाच्या रुग्णवाहिका मधील बेफिकीरी यामुळे संतोष पवार यांना आपला जीव गमवावा लागला असून चौक उपजिल्हा रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वाब घेण्यात आले.मात्र त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे खाली आलेले प्रमाण आणि त्यांच्या मध्ये दिसणारी लक्षणे पाहून आरोग्य विभागाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला.अखेर त्यांचा मृतदेह माथेरान येथे मूळ गावी न नेता कर्जत दहिवली येथील गॅस शवदाहिनी मध्ये त्यांच्या मृत आत्म्यावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली असून मृत्यू नंतर त्यांची करण्यात आलेली कोरोना टेस्टचे अहवाल अद्याप प्राप्त नाहीत,त्यामुळे संतोष पवार यांचा मृत्यू हा शासनाच्या व्यवस्थेचा बळी ठरले आहेत.मात्र या निमित्ताने शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित नर्सेस आणि डॉक्टर नाहीत का?एवढाच प्रश्न निर्माण होतो,यावर प्रशासनाने बोलायला हवे.
कोरोनाची लक्षणे संतोष पवार यांना दिसत असल्याने त्यांची टेस्ट घेण्यात आली आहे.मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणाला आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आज सकाळ पासून सोबत असलेले त्यांचा मित्र परिवार तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या अँटीजेन टेस्ट कर्जत उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आल्या.त्यात दिवंगत संतोष पवार यांचा मुलगा, मुलगी तसेच भावाची मुलगी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.तर पवार यांच्या पत्नी आणि अन्य चार यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले असून मुलांना माथेरान येथे त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहे.