माथेरानच्या जंगलाचा ऱ्हास होतोय : सक्षम कमिटी नेमण्याची स्थानिकांची मागणी

matheran-kachara
माथेरान (मुकुंद रांजाणे) : घनदाट जंगल म्हणजे माथेरान अशीच ओळख असणाऱ्या माथेरानमध्ये जंगलात कुणीही काहीही कचरा टाकत असल्याने या वनसंपदेवर मोठे संकट येण्याच्या मार्गावर असून पुढील काळात भयानक परिस्थिती निर्माण होण्याअगोदर माथेरानच्या जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी केवळ वनसंपदेवर देखरेख करण्यासाठी सक्षम कमिटी नेमण्याची स्थानिकांची मागणी होत आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी येथील धनगर समाजाचे माजी अध्यक्ष तथा अश्वपाल राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या बाजूला त्याचप्रमाणे जंगलात सर्वच ठिकाणी प्लास्टिक तसेच पाण्याच्या बाटल्या, कुरकुरे पाकीट यांचा जणू काही सडा पसरला आहे. तो काढून टाकण्यात यावा जेणेकरून इथली वनराई शाबुत राहू शकेल अन माथेरानच्या पर्यटनावर काही विपरीत परिणाम होणार नाही. राकेश कोकळे हे स्वतः आपल्या मित्र परिवार सोबत दरवेळी गावातील विविध भागात जाऊन स्वच्छता मोहीम श्रमदानातून करीत असतात त्यांच्या सोबत मागील काही दिवसांपूर्वी स्वतः अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांनी सुध्दा सहभाग नोंदवला होता.
आज पुन्हा एकदा राकेश कोकळे यांनी पॉईंट्स भागात फेरफटका मारला असता एको पॉईंट आणि लॅन्ड स्केप पॉईंट या ठिकाणी मोठया प्रमाणावर सिमेंट, रेतीच्या रिकाम्या गोणी जंगलात अस्ताव्यस्त विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे त्यांनी ताबडतोब सोशल मीडियावर ह्या कचऱ्याचे फोटो टाकले असता संबंधीत जो कोणी ठेकेदार आहे आणि नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी, व अन्य यांच्या बद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधीत ठेकेदारांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी एक करोड रुपयांपेक्षाही अधिक रक्कम खर्च केली जात आहे.
मग ठेकेदार त्यांच्या कामगारांकडून कामे करून घेतात की फक्त बिलांसाठी हजर राहतात याबाबत सुध्दा चर्चेला उधाण आले आहे. जर संबंधित ठेकेदारांना ही कामे जमत नसतील तर नगरपरिषदेने कोणत्याही सेवाभावी संस्थांना ठराविक रक्कम देऊन या गावाची स्वच्छता नियमितपणे करून घ्यावी. केवळ माथेरान मध्ये घनदाट जंगल आहे त्यामुळेच इथे गारवा,थंड वातावरण आहे.यासाठीच इथे पर्यटक येत असतात. नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने  कर्मचाऱ्यांना आणि संबंधीत ठेकेदारांना नाहक गोंजारने बंद करून कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही स्थानिकांमधून बोलले जात आहे.
——————————
नगरपालिका मुख्याधिकारी आणि एमएमआरडीए ठेकेदार यांना सूचना दिल्या आहेत. उद्या सर्व साफसफाई करून घेतो असे ठेकेदारने सांगितले आहे.
 —दीक्षांत देशपांडे, अधीक्षक  माथेरान
——————————
ज्या गावात राहतो ते गाव कष्टकरी लोकांचे गावं आहे.जगप्रसिद्ध एक पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळ म्हणजे पर्यावरणावर अवलंबून असलेलं माथेरान शहर आहे. त्या पर्यावरणाची काळजी आम्ही पर्यावरण प्रेमी घेतोच तशीच काळजी इथल्या ठेकेदारांनी आणि नगरपालिकेने सुद्धा घ्यावी जंगलामध्ये कधीही बॉटल, सिमेंट रेतीच्या गोणी तसेच प्लास्टिक पडलेले आहेत. कधीकधी असा प्रश्न पडतो घनकचरा ठेकेदार काय कामे करतो तरी काय की इथे येऊन पैसे कमवून जातो का हा एक प्रश्नच आहे.
—राकेश कोकळे, अश्वपाल तथा माजी अध्यक्ष धनगर समाज, माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *