
मुकुंद रांजाणे (माथेरान) : एकेकाळी स्वच्छ, हरित माथेरान म्हणून स्वच्छता अभियान अंतर्गत अनेक पारितोषिक प्राप्त झालेल्या माथेरान नगरीच्या जंगल भागात मागील वर्षांपासून कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असल्यामुळे संबंधीत प्रशासकीय अधिकारी वर्ग नेटाने कामे करतात की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात असून प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील धनगर समाजाचे माजी अध्यक्ष तथा कष्टकरी अश्वपाल राकेश कोकळे यांना बहुतांश जंगल भागातील सिमेंट रेतीच्या गोण्या प्लास्टिक बाटल्या कुरकुरे पाकिटे अस्तव्यस्त पडलेल्या दिसल्याने ही बाब अधीक्षक तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली असता ते सुद्धा अवाक झाले.

त्याप्रमाणे त्यांनी मुख्याधिकारी तसेच एमएमआरडीए च्या संबंधित ठेकेदारांना सूचना करुन ताबडतोब हा संपूर्ण कचरा गोळा करण्यास सांगितल्यानुसार जवळपास दोन टेंपो भरतील एवढया सिमेंट, रेतीच्या रिकाम्या गोणी उचलायला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर काही पॉईंट्स भागात कचराकुंड्या नसल्याने प्लास्टिक बाटल्या सुध्दा मोठया प्रमाणावर पडलेल्या आहेत.

आज स्वतः अधीक्षक तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पाहणी केली म्हणून त्यांच्या हे सर्व कचऱ्याचे साम्राज्य निदर्शनास आले आहे. त्यांनी सुध्दा सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांचा पुढाकार पाहून देशपांडे यांनी समक्ष पाहणी केल्यामुळेच माथेरानचे जंगल वाचले आहे. अन्यथा एखाद्याने पेटते सिगारेट वगैरे जंगलात टाकले असते तर प्लास्टिक गोण्यांनी पेट घेऊन हा संपूर्ण जंगलाचा परिसर खाक झाला असता यात शंकाच नाही. यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गासह वनखात्याने सुध्दा जंगलात फेरफटका मारून माथेरानचे जंगल शाबूत राहण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे असेही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.
——————————
जर का एखाद्या अधिकाऱ्याने एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही चांगले होऊ शकत याचं उत्तम उदाहरण म्हणजे माथेरानचे अधीक्षक तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे. आज दोन दिवस झाले इको पॉईंट,लँडस्केप पॉईंट आणि बालदी या ठिकाणी रेतीच्या गोणी सुमारे एक ते दीड लाख गोणी जंगलामध्ये पसरलेल्या अवस्थेत मी पाहिल्या होत्या आणि ही गोष्ट मी देशपांडे यांच्या कानावर टाकली तेव्हा त्यांनी आज माझ्यासोबत फिरून ठेकेदाराच्या कामगारांना घेऊन सगळ्या गोणी उचलायला सुरुवात केली आहे. माथेरानचे जंगल वाचले आहे त्याबाबत मनाला समाधान वाटले.
—राकेश कोकळे, माजी अध्यक्ष धनगर समाज, माथेरान
Related