माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ऐन गर्दीच्या वेळी प्रवासातून आल्यावर येथील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर अनेकदा बाहेर पडताना ताटकळत उभे राहावे लागते. विशेषतः महिला पर्यटकांना आपल्या लहान लहान बाळांना घेऊन या गर्दीच्या ठिकाणी स्तनपान सुध्दा करणे अवघड होते त्यामुळे दस्तुरी येथील नगरपरिषदेच्या प्रवासी कर वसुली जागेतील एका प्रशस्त खोलीत नगरपरिषदेच्या उत्तम प्रशासक सुरेखा भणगे
( शिंदे) यांच्या पुढाकाराने हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून यापुढे स्थनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे शक्य होणार आहे.
जेष्ठांना सुध्दा याठिकाणी दुसऱ्या बाजूच्या जागेत विश्रांती साठी खोली असणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच याठिकाणी दिशाभूल करून त्यांच्याकडून वाहतुकीसाठी अवाच्या सव्वा रक्कम घेतली जाते याकामी पर्यटकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व्हावे इथले विविध मुख्य पॉइंट्स त्याचप्रमाणे वाहतुकीच्या सुविधे बाबतीत माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र उभारण्यात आले आहे.
त्यामुळे साहजिकच पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे आजवर कुणीही राजकीय व्यक्तींना अशा साध्या आणि सोप्या कामांचा उलगडा झाला नव्हता परंतु अल्पावधीतच सुरेखा भणगे यांनी आपल्या परीने पर्यटकांना,नागरिकांना अभिप्रेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.