मुकुंद रांजाणे (माथेरान) : माथेरान साठी मागील काळात १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला होता त्यातील ४३ कोटी रुपये हे माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज रोड पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांसाठी खर्च करण्यात येत आहेत.ही कामे एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्ण केली जात असून या मुख्य रस्त्यांचे काम सध्यातरी युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्य रस्त्यावर सर्व व्यापारी, दुकानदार यांना धुळीच्या त्रासाला अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हे रस्ते धुळविरहित असावेत ही त्यांची मागणी होती त्यानुसार माथेरान या पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सनियंत्रण समितीच्या परवानगीने क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे त्याप्रमाणे ही कामे नियमानुसारच सुरू आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी याच मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु घोडे घसरतात याकारणाने घोड्याना चालण्यासाठी मधला भाग केवळ घोड्यांना चालण्यासाठी ठेवण्यात आला होता परंतु सद्यस्थितीत हेच घोडे पेव्हर ब्लॉकवर चालत असतात आणि नागरिक, पर्यटकांना लाल मातीच्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत होता. अतिवृष्टीमुळे या मधल्या भागातील रस्त्यांची अक्षरशः एखाद्या नाल्याप्रमाणे परिस्थिती झाली असून अर्धा ते एक फूट हा रस्ता खाली गेला आहे.
क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांच्या कामांना आता गती मिळाली असून युद्धपातळीवर सध्या या रस्त्यांची कामे सुरू आहेत. शनिवार आणि रविवार या दिवशी सुट्टयांचा हंगाम लक्षात घेता पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दोन दिवस ही कामे धीम्या गतीने सुरू ठेवली आहेत.
वर्षाअखेर ही ब्लॉकची कामे नियोजित ठिकाणापर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कामांना गती दिली जात आहे. या रस्त्यांमुळे व्यापारी वर्गाला यापुढे धुळीचा सामना करावा लागणार नसल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुध्दा चालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला असून आपले सामान सुद्धा अगदी सहजपणे ओढून नेऊ शकतात.