माथेरानच्या विकासाला विरोध करणाऱ्या अशिक्षित विचारांचा कडेलोट झाल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्य !

matheran1
माथेरान (मुकुंद रांजाणे) : ज्या गावात सुंदर रस्ते बनले जातात त्या गावाचा आपसूकच हमखास विकास होतोच होतो त्या गावाची प्रगती होऊन सर्वांनाच उत्तम प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात हे जरी त्रिवार सत्य असले तरीसुध्दा यास जगातील कदाचित माथेरान हेच एकमेव स्थळ असावे की अशा विकास कामांपासून काही अशिक्षित, वैचारिक बालिश बुद्धीच्या विचारांमुळेच अपवाद राहिलेले आहे.
शंभर लोकांचे ज्याठिकाणी भले होणार असेल त्यावेळी मूठभर लोकांचा विचार न करता गावाच्या प्रगतीमध्ये कशाप्रकारे भरती येऊ शकते यासाठी अभ्यासू लोकांनी ज्यांना भावी पिढीला आधुनिक युगाप्रमाणे सर्वतोपरी  यशाचं शिखर गाठण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी भक्कमपणे आधार देण्याची आवश्यकता बनली आहे.आजवर ज्यांनी केवळ वर्तमानाचा विचार करून इथल्या गधामजुरीच्या रोजंदारीत एक पिढी संपविली आहे.त्या अशिक्षित विचारांच्या लोकांना उज्जवल भविष्यात काय काय सुंदर प्रगती खुणावत आहे याबाबत काडीचेही ज्ञान नसल्यामुळे अशीच बालिश विचारांची मंडळी प्रामुख्याने विकासाला चालना देण्याऐवजी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर आर्थिक प्रलोभनांना बळी पडून विकासाला  विरोध करण्यात धन्यता मानतात.
एकीकडे विकासाला विरोध नाही म्हणणारी बालिश मंडळी नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली वावरत असून नको त्या ठिकाणी प्रत्येक कामांत नाहक खोडा आणून आपल्याला विरोधातूंन काही साध्य करता येते का याकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. शासनाने विकासात्मक पाऊल उचलले तरीसुद्धा होणाऱ्या कामांमध्ये चुका काढण्यात इथली स्वयंघोषित स्वतःला इंजिनियर समजणारी बालिश मंडळी अग्रेसर दिसतात. कोरोना काळात अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी गावातील विकास कामांना लागणाऱ्या साहित्याची वाहतूक गावातील हीच मंडळी करत होती ज्यांचा सद्यस्थितीत विकास कामांना विरोध आहे. परंतु २०१६ मध्ये अस्तित्वात असणाऱ्या सभागृहातील लोकप्रतिनिधीच्या ठरावा नुसार सर्वच कामे सुरू आहेत.
त्यामुळे होणाऱ्या कामांना विरोध करताना संबंधित लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसल्याने नाहक अधिकारी वर्गाला धारेवर धरून एकप्रकारे वेठीस आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीना काहीही करून सत्तेत विराजमान व्हायचे आहे त्यामुळे काही महत्वाकांक्षी मंडळी अगदी पातळी सोडून विकासाच्या विरोधात केवळ मतांसाठी राजकारण करतांना दिसतात. अशांना गावाच्या हितावह नवनवीन संकल्पना पर्यटकांना अभिप्रेत साधनांचा वापर करावा याबाबत स्वारस्य नसल्याने हे एक सुंदर पर्यटनस्थळ जरी आजमितीपर्यंत विकासापासून लांब असले तरी आगामी काळात होणाऱ्या नवनवीन बदलामुळे निश्चितपणे जगाच्या नकाशावर ठळक अक्षरात चमकेल असाही विश्वास आणि आशावाद गावाबद्दल सकारात्मक विचार करणाऱ्या भूमिपुत्रांना आहे.त्यासाठी माथेरानच्या विकासाला विरोध करणाऱ्या अशिक्षित विचारांचा कडेलोट झाल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्य असेही बोलले जात आहे.
—————————-
आजवरच्या इथल्या राजकीय घडामोडींचा आलेख पाहिला असता राजकीय क्षेत्रातील काही महत्वाकांक्षी मंडळींना केवळ स्वतःची पोळी भाजण्यासाठी विकास कामांना तिलांजली देऊन मतांचे राजकारण करून सत्ता कशाप्रकारे स्थापन करता येईल आणि त्याच सत्तेतूनच पद,पैसा आणि मोफतची प्रतिष्ठा प्राप्त करून आपला आणि कुटुंबातील सदस्यांना,नातेवाईकांना आर्थिक दृष्टीने सक्षम करता येईल याकडे कटाक्ष दिसत आहे.मग त्या निवडणुका सहकार क्षेत्रातील असोत वा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका असोत.त्यामुळेच माथेरान सारखे हे रमणीय सुंदर पर्यटनस्थळ आजही नतद्रष्ट्या,घाणेरड्या प्रवृत्तीच्या राजकीय मंडळींमुळेच विकासापासून वंचित राहिलेले आहे.अशा संतप्त प्रतिक्रिया जेष्ठ स्थानिकांमधून वारंवार उमटताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *