माथेरान (मुकुंद रांजाणे) : कोणत्याही क्षेत्रात अथवा शासकीय सेवेत आपले कर्तव्य पार पाडताना जेव्हा संबंधित अधिकारी हे ज्याठिकाणी आपली नोकरी (कर्तव्य ) पार पाडत असतात त्यावेळी त्या गावाशी आपले पूर्वापार ऋणानुबंध आहेत आणि त्या गावाचा सर्वांगीण विकास तेथील नागरिकांना अभिप्रेत असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न केले तरच त्या शासकीय अधिकाऱ्यांचा नावलौकिक होत असतो. हेच गुण अधिकारी वर्गाच्या अंगीकृत असावे लागतात ते इथे एक वर्षांपूर्वी नगरपरिषदेत प्रशासक पदावर कार्यरत असणाऱ्या सुरेखा भणगे यांच्या अंगी असल्याने त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे असोत, शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, जेष्ठ नागरिकांच्या समस्या असोत अथवा नगरपरिषदेचा कामगार वर्ग असो,महिलांच्या अडीअडचणी, श्रमिकांना भेडसावत असणाऱ्या समस्या यांचे निराकरण करण्यासाठी अत्यंत नम्रतेने पुढाकार घेऊन समस्या, कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
चांगली कामे प्रगतीपथावर जात असताना साहजिकच विरोध हा होतच असतो परंतु जराही न डगमगता प्रत्येक विरोधाचा सामना करत आलेल्या अडचणींवर मात करणाऱ्या एकमेव प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे(शिंदे ) यांचे नाव सर्वांच्या तोंडी ऐकावयास मिळत आहे. सुरेखा भणगे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांच्या घराची कामे पूर्ण झाली आहेत.आपल्या वास्तूची डागडुजी नागरिक करत आहेत. त्यासाठी त्यांनी आजवर आपल्या कार्यकाळात कुणालाही काही त्रास दिलेला नाही. मुख्य म्हणजे सुरेखा भणगे यांची शासकीय सेवेतील स्वच्छ प्रतिमा असल्याने त्या बिनधास्तपणे येणाऱ्या समस्यांवर मात करीत आहेत. कार्यालयात जरी काही बाबी अन्य अधिकारी वर्गाकडून अप्रत्यक्षपणे घडत असतात त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच त्यांची एक उत्तम प्रशासक आणि एक स्पष्टपणे, दिलखुलास पणे कामे करणारी अधिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
शासकीय अधिकृत कामांवर त्यांचा अधिक भर असल्याने त्यांच्या या कामाची पद्धत काही मंडळींना रुचत नसल्यामुळे अनेकदा वरिष्ठांपर्यंत त्यांच्या तक्रारी केल्या आहेत आणि अद्यापही काही मंडळी करत आहेत त्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण शासकीय सेवेत कामाला आहोत आणि आपल्याला आपल्या कर्तव्यावर लक्ष वेधले पाहिजे आपण आपल्या कामाचा पगार शासनाकडून घेत आहोत फक्त पगारासाठी नोकरी करत नाही हा विचार ठेऊन त्यांनी स्वतःला कामात इतके झोकून दिले आहे की त्यांना जेवण करायला सुध्दा वेळ मिळत नाही. नातेवाईक आल्यास त्यांना वेळ द्यायला मिळत नाही विशेष म्हणजे त्या आपल्या शासकीय खोलीत राहतात आजवर अनेक मुख्याधिकारी येऊन गेले पण ते फारकाळ शासकीय खोल्यांत राहिले नाही एखादया हॉटेलमध्ये राहून ऐशोआराम करत राहिले. परंतु सुरेखा भणगे इथेच शासकीय खोलीत राहत असल्याने नागरिकांच्या समस्या त्यांना माहीत होतं होत्या. कार्यालयातील प्रत्येक कामगारांकडून उत्तम प्रकारे कामे करून घेतली जात आहेत.सर्वांशी आपुलकीने आणि वयस्कर कामगारांशी अगदी प्रेमाने बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे.
कामगारांकडून जरी चुका झाल्या तरी त्यांना समज देऊन सोडविल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर जे कामगार कंत्राटी पध्दतीने ठेकेदारांकडे कामाला आहेत त्यांनाही यावेळी नवीन ड्रेस नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरेखा भणगे यांनी दिले आहेत. प्रत्येक सणाला कामगारांना भेटवस्तू वाटप केल्या जात आहेत. आजवरच्या मुख्याधिकारी यांना जे जमले नाही ते भणगे यांनी केले आहे म्हणून कामगार वर्ग सुध्दा त्यांची स्तुती करत आहेत. कोरोना काळात सुध्दा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा उपलब्ध होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली होती.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती अंधाऱ्या रात्री सुध्दा नागरिकांच्या नागरी वस्तीत जाऊन लोकांची विचारपूस त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. असे अधिकारी क्वचितच एखाद्या गावाला लाभतात त्यामध्ये सुरेखा भणगे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांचा तीन वर्षांचा कालावधी माथेरान मध्ये पूर्ण करून आणखीन या गावाच्या विकासासाठी नवनवीन कल्पना, योजना राबविव्यात आणि इथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे.