माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरानचा शोध १८५० मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी लावल्यापासून याठिकाणी घोडा आणि हातरीक्षा हीच वाहतुकीची साधने अस्तित्वात आहेत, परंतु नुकताच याठिकाणी उत्तम दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते केल्यानंतर इथे पर्यावरण पूरक ई रिक्षा आजपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ प्रकाश झोतात येण्याच्या मार्गावर दिसत आहे.
आज येथील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर ई रिक्षाला आर टी ओ चे अधिकारी कदम आणि शालेय विद्यार्थ्याने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ई रिक्षा साठी दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे निवृत्त शिक्षक सुनील शिंदे, प्रशासक सुरेखा भणगे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, प्रेरणा सावंत, माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रकाश सुतार,प्रदीप घावरे, श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, अधिक्षक दीक्षांत देशपांडे,पोलीस निरीक्षक शेखर लव्हे,उप वन निरीक्षक उमेश जंगम,राजेंद्र मांडे यांसह नगरपरिषदेचे अधिकारी, नागरीक या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना यासाठी केवळ पाच रुपये शुल्क तर पर्यटकांना ३५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये या ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासामुळे समाधान व्यक्त होत आहे.
——————————–
माथेरानमध्ये दस्तुरी पासून रेल्वे स्टेशन पर्यंत हॉटेल पर्यंत स्वस्तात आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध नव्हती. आज याठिकाणी ई रिक्षा सारखा सुंदर प्रकल्प सुरू झाला आहे त्यामुळे खुप आनंद होत आहे. यानिमित्ताने आम्हाला खूपच कमी वेळात रेल्वे स्टेशन पर्यंत स्वस्तात ,सुरक्षित प्रवास करता आला आहे.
—प्रज्ञा गायतोंडे, पर्यटक मुंबई
——————————–
दस्तुरी नाक्यावर ई रिक्षाच्या स्टेशनवर सध्या फक्त पाचच वाहने असल्याने गर्दीत थोडे थांबावे लागले. लवकरच अधिक रिक्षा मागवून सर्वाना ह्या सेवेचा लाभ व्हावा.
—-आशुतोष सेनापती, पर्यटक मुंबई
——————————–
आमची शाळा खूपच दूर आहे त्यामुळे माझे दप्तर कधी आईला तर कधी बाबांना घेऊन यायला लागत होते. येथील निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी ई रिक्षासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळेच ई रिक्षा सुरू झाली आहे. आता मला आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना आरामात या वाहनाच्या साहाय्याने प्रवास करता येणार आहे.
—उमेर अनिस शेख, शालेय विद्यार्थी सेंट झेवीयर स्कुल माथेरान
——————————–
ई रिक्षा सुरू होण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते ते पूर्ण झाले आहेत पुढील काळात सर्वानी या सेवेचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे.