माथेरान (मुकुंद रांजाणे) : हिरवेगार,शांत आणि थंड हवेचे माथेरान अशी ओळख असलेल्या या सुंदर पर्यटनस्थळाची ही बिरुदावली संपुष्टात आणण्यासाठी काही धनाढयांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू असून काहींनी जुने बंगले विकत घेऊन त्याजागी आलिशान हॉटेल्सची बांधकामे करताना बंगल्याच्या आवारातील संपूर्ण वनराई जमीनदोस्त केल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु याकडे वनखात्याने हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याने अशा धनाढयांना झाडांची बेसुमार कत्तल करण्यासाठी वाटा मोकळ्या झालेल्या आहेत.
येथील डंपिंग ग्राऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सेट व्हीला हा बंगला असून या बंगल्याच्या आवारातील जवळपास सर्वच झाडी जमीनदोस्त केल्याचे दिसून येत आहे. हा बंगला एकेकाळी आजूबाजूला असणाऱ्या गर्द झाडीमुळे दृष्टीस येत नव्हता तो आता स्पष्टपणे दिसत आहे. एवढी मोठया प्रमाणावर या बंगला धारकाने झाडी नष्ट केली आहे. वनखात्याला याबाबत अनेकदा नागरिकांकडून सूचित करण्यात आले होते. परंतु अशा धनाढयांना जंगलतोड करण्यासाठी मुभा दिली आहे की काय असाही प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.
याच बंगले धारकांच्या मालकीच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या बंगल्याचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले असून सर्व डेब्रिज रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आले आहे त्यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे दरवर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असून दुसरीकडे अशाप्रकारे धनाढयांना जंगलतोड करण्यासाठी मोकळीक दिली जात आहे.
सेट व्हीला या बंगल्यात आतापर्यंत जी काही वृक्षतोड झाली आहे. त्याबाबत वनखात्याकडे वृक्षांची नोंद आहे की नाही असेही बोलले जात आहे. अनेक धनाढयांनी दोन दशकांपासून याठिकाणी जुने बंगले विकत घेऊन त्याठिकाणी थ्री स्टार हॉटेल्स उभारली आहेत तर काही हॉटेल धारकांनी मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादामुळेच व्यापलेली आहे. मर्यादे पेक्षाही भरमसाठ रूम्स बांधलेले आहेत.
एकंदरीत वनखात्याच्या भोंगळ कारभारामुळे इथली वनसंपदा लोप पावत चालली आहे. अशीच परिस्थिती पुढेही सुरूच राहिली तर माथेरान हे पर्यटनस्थळ उजाड व्हायला वेळ लागणार नाही.
—————————
संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत 2020 मध्ये जून महिन्यात सेट व्हीला या बंगल्यात तत्कालीन वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी पूर्वीच्या सर्व्हे पेक्षा काही प्रमाणात झाडे कमी झाल्याचे आढळून आले. परंतु राजकीय हस्तक्षेपामूळे वन विभागाला मर्यादा निर्माण झाल्या आहेत.
—-योगेश जाधव, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती माथेरान
—————————
सेट व्हीला या बंगल्यात झाडे तोडली नाहीत मी स्वतः आत बंगल्याच्या आवारात जाऊन आलो आहे आणि जे काही बांधकाम केले असेल त्यावर नगरपालिकाने काय करावे हे ठरवावे.