माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुका जरी लांबणीवर गेल्या असल्या तरी सुद्धा पक्षप्रवेश मालिका सुरूच असून माथेरानमध्ये सध्यातरी शिवसेनेच्या शिंदे गटात इनकमिंग जोरात दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात युवकांची दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. प्रत्येक प्रभागातील युवकांनी शिंदे गटाला पसंती देत शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता बिनशर्त पक्षप्रवेश करत आहेत.
आज दि.१६ रोजी येथील मुस्लिम समाजातील असंख्य युवकांनी शिंदे गटाच्या शिवसेना शाखेत चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी उप शहरप्रमुख प्रमोद नायक, माजी नगरसेवक प्रकाश सुतार,संदीप शिंदे, ज्ञानेश्वर बागडे, अकबर मुजावर, अनिस शेख, अशोक वाघेला, युवा सेनेचे निखिल शिंदे, अनिकेत जाधव, गौरंग वाघेला,खालिद शेख, मीरा फाउंडेशनच्या संचालिका रेखा चौधरी, महिला आघाडी युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा पक्षप्रवेश केला आहे यामध्ये सोहेल महापुळे, अली अजगर डोंगरे, समीर महापुळे, अब्दुल महापुळे, इम्रान महापुळे, अकीब महापुळे, अतिक पटेल, अफाक महापुळे, अतिक वलगे,अन्वर पटेल, राजू पटेल, आरिफ पटेल, आदिल पटेल,आलम मुजावर,जाकीर मुजावर, रियाज मुजावर,शफिक शेख,हमीद महापुळे, रियान मुजावर यांचा समावेश आहे.यावेळी सर्वांचे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.
माथेरानमध्ये शिंदे गटात जो काही नवोदित कार्यकर्त्यांचा भरणा वाढत आहे तो चंद्रकांत चौधरी यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून येत आहे त्यांना माहीत आहे की शिंदे गटात गेल्याशिवाय आता गत्यंतर नाही. दरमहा पेन्शन योजना सुरू केली आहे ती अविरतपणे सुरू राहावी जेणेकरून गरजवंतांना याचा पुढेही लाभ घेता येईल. पुढील काळात नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचा नगराध्यक्ष व्हायला हवा त्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी आपले मत व्यक्त केले.
त्याचप्रमाणे अनिस शेख, नितेश कदम, निखिल शिंदे यांनी सुध्दा आपले अनमोल विचार यावेळी व्यक्त केले.
माथेरानमध्ये एकूण सात पक्ष कार्यरत आहेत परंतु सद्यस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेशांची मालिका सुरू आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांनी जोपर्यंत निवडणुका आणि आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत बघ्याची भूमिका घेतली असून त्यासाठीच आपल्या खर्चावर सुध्दा यानिमित्ताने त्यांनी नियंत्रण ठेवले आहे.