माथेरान (मुकुंद रांजाणे) : नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे इथले थंड वातावरण राजकीय दृष्टीने गरम होऊ लागले आहे. एकेकाळी एकत्रित असणाऱ्या राजकीय मंडळीने आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्यातरी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे तरुण कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि उप शहरप्रमुख प्रमोद नायक यांच्यावर विश्वास ठेवून विविध प्रभागातील कार्यकर्ते शिंदे गटात स्वेच्छेने, बिनशर्त, कशाचीही अपेक्षा न बाळगता सामील होताना दिसत आहेत.
आज येथील शिवसेनेच्या ठाकरे गटातील मुस्लिम मोहल्ल्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला आहे.
छोटेखानी हा कार्यक्रम शिवसेना शाखेत पार पडला. यामध्ये अन्वर पटेल, राजू पटेल, आरिफ पटेल, आदिल पटेल,आलम मुजावर,जाकीर मुजावर, रियाज मुजावर,शफिक शेख,हमीद महापुळे, रियान मुजावर यांचा समावेश आहे.
या सर्वांचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि प्रमोद नायक यांनी स्वागत केले.
माथेरान मधील प्रत्येक वार्डातील कार्यकर्ते आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात स्वखुशीने यायला इच्छुक आहेत. लवकरच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा लवाजमा आपल्या शिंदे गटात समाविष्ट होणार आहे असे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.
यावेळी युवा सेनेचे निखिल शिंदे, गौरंग वाघेला, अनिकेत जाधव, जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे यासंह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.