माथेरान (मुकुंद रांजाणे) : जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना माथेरान सारख्या अतिदुर्गम भागात आजही जुन्या परंपरा आणि जी काही मालाची अथवा पर्यटकांची वाहतूक व्यवस्था सुरू आहे. त्यात एवढ्या वर्षात बदल झाला नव्हता तो नक्कीच आगामी काळात ई रिक्षा सारख्या वाहनांच्या माध्यमातून पूर्णत्वास जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. सुप्रीम कोर्टाने ई रिक्षा सुरू होण्यासाठी सध्या जी काही प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू झाली आहे, त्यामुळे नक्कीच पुढील काळात या गावाचे नंदनवन होणार असून येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मी आणि माझे असंख्य कार्यकर्ते ई रिक्षाच्या समर्थनार्थ जाहीर पाठिंबा देऊन सक्षम उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत असे माजी नगराध्यक्ष दिलीपशेठ गुप्ता यांनी सांगितले आहे. ई रिक्षाचे सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्ते निवृत्त शिक्षक सुनील शिंदे,हात रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी दिलीप गुप्ता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गुप्ता पुढे म्हणाले की, या गावाला विकसनशील बनविण्यासाठी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्यासाठी जुन्या रूढींना आणि ज्या बाबींचा अक्षरशः कंटाळा आला आहे. त्यामध्ये बदल, परिवर्तन झाल्याशिवाय ह्या गावाची सुधारणा होणार नाही भले परिवर्तन हे कधीच त्रासदायक नसते परंतु परिवर्तनामुळे होणारा विरोध हाच मुख्यत्वे त्रासदायक असतो. त्यामुळे सध्यातरी आपल्या माथेरानने ई रिक्षा सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून एक पाऊल विकासाच्या दिशेने टाकले आहे यामुळे खरोखरच मनोमन आनंद होत आहे.यापूर्वी सुध्दा आम्ही असे वाहतूक व्यवस्थेचा गावात बदल होण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळेस अनिल तावडे, छोटुभाई खान, बबनशेठ पाटील असंख्य स्थानिक व व्यापारी यांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला होता परंतु त्यास काही स्वार्थी व्यक्तींमुळेच यश आले नव्हते.त्यामुळे आता जे काही ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची दूरवर शाळेत जाताना होणारी पायपीट, जेष्ठ पर्यटकांना त्याचप्रमाणे रुग्णांना, नागरिकांना या ई रिक्षाच्या व्यवस्थेमुळे न्याय मिळाला आहे. आज जेष्ठ पर्यटकांची संख्या याच ई- रिक्षाच्या मुळे वाढली आहे आणि भविष्यात आणखीन वाढणार आहे यात शंकाच नाही. माथेरान ची जनता पालिका निवडणुकीत ई रिक्षा समर्थक पॅनलच्या बाजूनी ठाम पणे उभी राहील अशी अपेक्षा आहे.गावाच्या व पुढील पिढीचा विचार करण्याची हीच वेळ आहे.
जर गावात परिवर्तन झाले तर इथे आपसूकच पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारी संपुष्टात येईल आणि माथेरान मधील प्रत्येक नागरिक असो किंवा सुशिक्षित बेरोजगार युवक असोत ई रिक्षामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायात आपल्या कुटुंबातील सदस्यांना आधार देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी आपल्या आवडीनुसार वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत.त्यामुळे या होत असलेल्या परिवर्तनाचा सर्वाना स्वीकार करावा लागणार आहे. जेवढा विरोध होईल तितक्या जोमाने ही सेवा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या परीने पाऊल उचलेल असा विश्वास दिलीपसेठ गुप्ता यांनी व्यक्त केला.
———————————————-
मा.सर्वोच्च न्यायालयाने ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्ट साठीच्या आदेशात कुठेही अटी व शर्ती लादलेल्या नाहीत. कोर्टात चाळीस मिनिटे युक्तिवाद झाला न्यायाधीशांनी राज्य सरकार च्या वकिलांना विचारले की, माथेरानला ई-रिक्षा सुरू करण्यासाठी सरकारने काय तयारी केली आहे. तेव्हा वकील राहुल चिटणीस यांनी सांगितले की, माथेरानच्या प्रचंड चढ उताराच्या रस्त्यावर कोणत्या कंपनीची ई रिक्षा चालू शकते याची चाचपणी करण्यासाठी तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टची मागणी केली. वाहतूक ही एक अत्यावश्यक सेवेत मोडते आर टी ओ च्या नियमानुसार चोवीस तास सेवा सुरू राहू शकते पायलट प्रोजेक्टची वेळ सनियंत्रण समितीने व पालिकेने लोकांच्या सोयीनुसार निश्चित केले आहेत व यात बदल करण्याचा अधिकार त्यांचाच आहे ई रिक्षा हा न्यायप्रविष्ट विषय असल्याने ज्या कोणाचाही आक्षेप असेल त्यांनी कोर्टात दाद मागणे हाच एकमेव पर्याय उरलेला आहे.